
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा हिला ‘रहना है तेरे दिल में’ या रोमँटिक चित्रपटातून विशेष लोकप्रियता मिळाली. आर. माधवनसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आजही या चित्रपटातील मॅडी आणि रीनाची प्रेमकहाणी चाहत्यांच्या मनात घर करून आहे. मात्र, अनेकांना दीयाचा हा पहिलाच चित्रपट असल्याचं वाटतं. आता अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. ‘रहना है तेरे दिल में’च्या आधीच तिने दोन चित्रपटांसाठी काम सुरू केलं होतं.
दीया मिर्झाने नुकत्याच दिलेल्या ‘स्क्रीन स्पॉटलाइट’ या मुलाखतीत आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या. मिस इंडिया आशिया पॅसिफिकचा किताब जिंकल्यानंतर तिला एकापाठोपाठ एक तीन चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. यामध्ये सर्वप्रथम ‘ओम जय जगदीश’, त्यानंतर ‘दीवानापन’ आणि मग ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटांचा समावेश होता.
हॉटेलच्या लॉबीमध्ये मिळाली पहिली चित्रपटाची ऑफर
दीयाने सांगितलं की, दिग्दर्शक अनुपम खेर आणि अभिनेता अनिल कपूर हैदराबादमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले असताना त्यांची नजर हॉटेलच्या लॉबीमध्ये असलेल्या दीयावर पडली. त्यावेळी ती मिस इंडिया आशिया पॅसिफिकचा किताब जिंकल्यानंतर घरी परतली होती. याच भेटीत तिला ‘ओम जय जगदीश’ या चित्रपटाची ऑफर मिळाली.
मॉडेलिंगनंतर लगेच चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याबाबत दीया सुरुवातीला थोडी साशंक होती. मात्र, अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी तिला निर्णय घेण्यासाठी वेळ असल्याचं सांगत प्रोत्साहन दिलं. नंतर अनुपम खेर यांनी तिच्या पालकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली.
‘दीवानापन’ची शूटिंग आधी, पण ‘ओम जय जगदीश’मध्ये दुसरी अभिनेत्री
‘ओम जय जगदीश’च्या तयारीदरम्यान दीयाने प्रसिद्ध थिएटर दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांच्या कार्यशाळेतही सहभाग घेतला. त्याच काळात निर्माते वाशू भगनानी यांनी तिला पाहिलं आणि ‘दीवानापन’ चित्रपटाची ऑफर दिली. दीयाने या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर ‘ओम जय जगदीश’च्या तयारीला पुन्हा सुरुवात केली. मात्र, अखेरीस या चित्रपटातील तिची भूमिका तारा शर्मा यांनी साकारली.
यानंतर वाशू भगनानी यांनी दीयाला ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाची ऑफर दिली. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून दीया मिर्झाला मोठी ओळख मिळाली. सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश न मिळालेल्या या प्रेमकथेला कालांतराने कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला.
Source: TV9 Marathi National
