Hashtagintro

14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर बंद झाला का? नवीन कनेक्शन मिळणं कठीण; नेमकं कारण काय?

14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर बंद झाला का? नवीन कनेक्शन मिळणं कठीण; नेमकं कारण काय?

देशभरात नवीन घरगुती गॅस कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः 14.2 किलोच्या नियमित घरगुती गॅस सिलेंडरच्या नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मार्च 2026 पासून सरकारी तेल कंपन्यांनी नवीन 14.2 किलोच्या सिलेंडरचे कनेक्शन देण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवली असून, अद्याप या निर्णयात बदल झालेला नाही. इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) आणि एचपी गॅस (HP Gas) या तिन्ही कंपन्यांकडून नवीन 14.2 किलोचे घरगुती गॅस कनेक्शन दिले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही, तर कंपन्यांच्या ऑनलाइन बुकिंग सिस्टिममधूनही या सिलेंडरचा पर्याय हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

या निर्णयाचा फटका नवीन घरात राहायला जाणाऱ्या कुटुंबांना आणि नव्याने संसार सुरू करणाऱ्यांना बसत आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर आणि जबलपूर या प्रमुख शहरांमध्येच सुमारे 70 हजार गॅस कनेक्शनचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे.

आता कोणते सिलेंडर मिळत आहेत?

सध्या नवीन कनेक्शनसाठी 5 किलो आणि 10 किलोचे सिलेंडर उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नियमित वापरासाठी 14.2 किलोच्या सिलेंडरला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसमोर त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे. त्याचबरोबर घरगुती वापरासाठी पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचाही या निर्णयामागे संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.

छोट्या सिलेंडरसाठी मोजावे लागतायेत जास्त पैसे

14.2 किलोच्या नवीन सिलेंडरचे कनेक्शन मिळत नसल्याने ग्राहकांना पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. विशेषतः छोट्या सिलेंडरचे दर तुलनेने अधिक असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 किलोचा नवीन सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांना सुमारे 1,600 रुपये मोजावे लागत आहेत. घरगुती वापरासाठी नियमित सिलेंडर उपलब्ध नसल्याने अनेकांना महागडे पर्याय स्वीकारण्याची वेळ आली आहे.

नवीन गॅस कनेक्शन कधी सुरू होणार?

सध्या सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 14.2 किलोच्या सिलिंडरचे नवीन कनेक्शन पुन्हा कधी सुरू होणार? मात्र, याबाबत पेट्रोलियम मंत्रालय किंवा संबंधित तेल कंपन्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

देशभरात नवीन कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित असल्याचं सांगितलं जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅस पुरवठ्याची परिस्थिती सुधारल्यानंतरच या निर्णयाबाबत पुढील पावलं उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नवीन कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.

महत्त्वाचं: नवीन 14.2 किलोच्या कनेक्शनवरील निर्बंध कधी उठणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी गॅस एजन्सी किंवा संबंधित तेल कंपनीकडून ताज्या माहितीसाठी खात्री करून घ्यावी.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language