Hashtagintro

32 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा होतोय प्रदर्शित, ‘रामायण’सोबत होणार टक्कर?

32 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा होतोय प्रदर्शित, ‘रामायण’सोबत होणार टक्कर?

दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर मोठी सिनेमॅटिक टक्कर पाहायला मिळणार आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि यश यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रामायण’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच, 90 च्या दशकातील सुपरहिट अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट ‘मोहरा’ तब्बल 32 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट 4K री-मास्टर्ड व्हर्जनमध्ये 6 नोव्हेंबर रोजी पुन्हा रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण – पार्ट 1’ हा 2026 मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी माता सीता, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अशातच अक्षय कुमारच्या ‘मोहरा’च्या पुनर्प्रदर्शनामुळे दिवाळीच्या काळात बॉक्स ऑफिसवर दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील चित्रपटांची चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, ‘मोहरा’ची निर्मिती करणाऱ्या त्रिमूर्ती फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ शेअर करून चित्रपटाच्या री-रिलीजची माहिती दिली आहे. हा चित्रपट रिम्पी फिल्म्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.

आग्र्यातील थिएटरमध्ये ‘मोहरा’चे चारही शो

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील प्रसिद्ध हिरा टॉकीजमध्ये ‘मोहरा’चे प्रदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे, या सिंगल-स्क्रीन थिएटरमध्ये दिवसातील चारही शो ‘मोहरा’साठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या थिएटरमध्ये ‘रामायण’ला एकही शो मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, रिम्पी फिल्म्स इंटरनॅशनलकडून त्रिमूर्ती फिल्म्सच्या इतर जुन्या गाजलेल्या चित्रपटांचेही पुनर्प्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. यात ‘विधाता’ (1982), ‘त्रिदेव’ (1989), ‘गुप्त’ (1994) आणि ‘युद्ध’ (1985) यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

1994 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘मोहरा’

अक्षय कुमारचा ‘मोहरा’ हा चित्रपट 1 जुलै 1994 रोजी प्रदर्शित झाला होता. या अ‍ॅक्शन-ड्रामामध्ये अक्षय कुमारसोबत नसीरुद्दीन शाह, सुनील शेट्टी, रवीना टंडन, परेश रावल, गुलशन ग्रोवर, रझा मुराद, सदाशिव अमरापूरकर आणि पूनम झावर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

चित्रपटातील दमदार अ‍ॅक्शन, लक्षात राहणारे संवाद आणि विजू शाह यांचे लोकप्रिय संगीत यामुळे ‘मोहरा’ त्या काळात बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language