
ज्येष्ठ मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर त्यांच्या ‘कापूसकोंडा‘ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं ते अनेक माध्यमांना मुलाखती देत आहेत. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सचिन पिळगांवकर यांनी दोन दिग्गजांबद्दल भाष्य केलं आहे. त्यांचं नाव घेताच अंगावर काटा येतो, असंही सचिन पिळगांवकर म्हणाले. सचिन पिळगांवकर म्हणाले की, ‘मला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. मला ‘गीत गाता चल’ या सिनेमात स्वत:ला गायचंही होतं. पण माझ्या दोन्ही बाजूला इतके मोठे दिग्गज गायक होते, एकीकडे पाहिलं तर मोहम्मद रफी आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर किशोर कुमार. त्यांचं नाव घेताच आता माझ्या अंगावर काटा आला आहे.’
‘हे दोन दिग्गज मला माझ्या दोन्ही बाजूंना दिसत आहेत, मग मी प्लेबॅक सिंगिग करेन, याचा विचार करायची माझी काय हिंमत. मी यांच्यासारखा आहे का? तर पटकन नाही असं उत्तर यायचं आणि मी त्यांच्यासारखा होऊच शकत नाही. त्यामुळे मी मागे हटलो. यांच्यात मी कुठेच नाही. माझी औकातच काय आहे यांच्यासमोर गाण्याची? मी प्रयत्नच करू शकत नाही. मी म्हटलं, सॉरी सर, मी माझा अभिनयच सुरू ठेवेन. आवड आहे तर गात राहीन यांच्याकडून शिकत राहीन. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं.’
सचिन पिळगांवकर यांनी सांगितला किस्सा
मोहम्मद रफी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना सचिन पिळगांवकर म्हणाले की, ‘रफी साहेबांसोबत माझी पहिली भेट झाली तेव्हा मी 11-12 वर्षांचा होतो. तेव्हा ‘बचपन’ फिल्म बनत होती. मला संगीताची आवड, त्यामुळे मी त्या फिल्मचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर केपी आत्मा यांना जेव्हा रेकॉर्डिंग होईल तेव्हा मला नक्की बोलवा. मी येऊन पाहीन, ऐकेन. असं त्यांना सांगितलं. तेव्हा ताडदेवमध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओ होता, तो आता नाही. तिथं गाण्याचं रेकॉर्डिंग आहे, रफीसाहेब गाणार असल्याचं मला सांगण्यात आलं.’
‘मी तिथं गेलो. प्यारेभाई सगळ्या म्युझिशिअन्ससोबत होते. सिंगर्स रूममध्ये गेलो. तिथं पाहिलं की, लक्ष्मीकांत रफीसाहेबांसोबत बसले होते आणि त्यांना गाणं शिकवत होते आणि त्यांनी ते समजून गायलंही, त्यासाठी किती ज्ञान लागतं. माझा रफीसाहेबांसोबत एकही फोटो नाही. माझी त्यांना विचारायची हिंमतच झाली नाही.’ असंही सचिन पिळगांवकर यांनी शेवटी म्हटलं. ‘गपशप विथ फिरदौस रफी’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर बोलत होते.
Source: TV9 Marathi Entertainment
