Hashtagintro

Yemen Airstrikes: सौदीच्या हल्ल्याने येमेन हादरले! 13 चिमुकल्यांसह 33 जणांचा मृत्यू

येमेनच्या सना प्रांतात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने केलेल्या रक्ताच्या नद्या वाहणाऱ्या हवाई हल्ल्यांनी संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. या भीषण हल्ल्यांमध्ये तब्बल 33 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यात 13 लहान मुले आणि 8 महिलांचा समावेश असल्याचे हूती अधिकाऱ्यांनी रविवारी जाहीर केले आहे. याशिवाय, या हल्ल्यांमध्ये 39 जण गंभीर जखमी झाले असून देशात पुन्हा एकदा उसळलेल्या गृहयुद्धामुळे मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.
हूतींच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अनीस अल-असबाही यांनी समाजमाध्यम मंच ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, सौदी आघाडीने येमेनची राजधानी सना शहराच्या पूर्वेकडील अल-शरिया गावाला लक्ष्य केले. या हल्ल्यात 12 पुरुष, 8 महिला आणि 13 निष्पाप बालकांचा बळी गेला आहे, तर जखमींमध्ये 16 पुरुष, 10 महिला आणि 13 मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हूतींच्या वृत्तसंस्थेने आरोप केला आहे की, विमानांनी दोन वेळा हल्ले करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी आलेली मदत आणि बचाव पथकांनाही लक्ष्य केले. इराणसमर्थित हूती संघटनेच्या वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये हल्ल्या ठिकाणाहून उठणारे धुराचे लोट, पसरलेले मलब्याचे ढिगारे आणि रुग्णालयात उपचार घेत असलेले रक्तबंबाळ जखमी नागरिक स्पष्टपणे दिसत आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/07/code-100-talk-of-code-100-being-issued-in-iran-is-the-entire-military-on-high-alert-the-shadow-of-war-looms-over-west-asia/
दुसरीकडे, येमेनमधील आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारला पाठिंबा देणाऱ्या सौदी अरेबियाने या हवाई हल्ल्यांवरील वृत्तावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने शनिवारी एका निवेदनात, रियाध प्रांताच्या दिशेने डागण्यात आलेले हूतींचे क्षेपणास्त्र हवेतच रोखून नष्ट केल्याचे सांगितले होते.
याउलट, हूती संघटनेने देखील सौदी अरेबिया तसेच येमेनमधील सौदी सैनिक, लष्करी तळ आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले तीव्र केल्याचा दावा केला आहे. हूतींचे लष्करी प्रवक्ते याह्या सरी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये आपण तब्बल सहा लष्करी मोहिमा राबवल्याचे सांगितले. यामध्ये सौदी अरेबियाची जागतिक तेल कंपनी ‘अरामको’ची केंद्रे, रियाध विमानतळ आणि दोन्ही देशांच्या सीमेलगतचे लष्करी तळ लक्ष्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, येमेनमध्ये अनेक वर्षे शांतता प्रस्थापित राहिल्यानंतर जुलै महिन्यात हूती बंडखोर आणि सौदीसमर्थित सरकार यांच्यात पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्ष उफाळून आला. यामुळे मध्यपूर्वेत आधीपासूनच सुरू असलेल्या वादात युद्धाचा आणखी एक नवा मोर्चा उघडला गेला असून, सौदी अरेबियाकडून हूतींच्या ठिकाणांवर सातत्याने विनाशाचे हवाई हल्ले केले जात आहेत. तेलसंपत्तीने समृद्ध असलेल्या सौदीविरोधात हूतींनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language