Hashtagintro

Armour-Piercing Bullets | दहशतवाद्यांकडून आता चिलखत भेदणार्‍या गोळ्‍यांचा वापर!

अनिल साक्षी

जम्‍मू : भारतीय तपास आणि सुरक्षा यंत्रणांनी कंबरडे मोडल्‍याने चवताळलेल्‍या दहशतवादी संघटनांनी आता या यंत्रणांना घाबरवण्‍यासाठी हल्‍ल्‍यांमध्‍ये थेट ‘आर्मर पिअर्सिंग’ (कवच भेदणार्‍या) गोळ्‍यांचा वापर सुरू केल्‍याची अत्‍यंत गंभीर आणि धक्‍कादायक माहिती कुलगाममधील दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या तपासातून पुढे आली आहे. कुलगाममध्‍ये दहशतवाद्यांनी बंदुकीतून झाडलेल्‍या या कवचभेदी गोळ्‍यांनी बुलेटप्रूफ जॅकेटसुद्धा भेदल्‍याचे समोर आले आहे.

कुलगाम जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नाक्यावर चार दिवसांपूर्वी दहशतवादी हल्‍ला झाला होता. या हल्ल्याच्या प्राथमिक तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांनुसार, दहशतवाद्यांनी हे कृत्‍य तडीस नेण्यासाठी अत्यंत घातक अशा ‘आर्मर पिअर्सिंग’ गोळ्यांचा वापर केला. तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, या गोळ्या इतक्या शक्तिशाली होत्या की, त्यांनी कर्तव्यावर असलेल्या ‘सीआरपीएफ’ जवानांचे ‘बॉडी आर्मर’ (बुलेटप्रूफ जॅकेट) देखील भेदले. याच कारणामुळे सुरक्षेचे कवच परिधान केलेले असतानाही जवानांना गंभीर दुखापत झाली.

हल्लेखोरांनी या हल्ल्यात एके-४७ रायफलींचा वापर केल्‍याचेही प्राथमिक फॉरेन्सिक व बॅलिस्टिक तपासात पुढे आले आहे. मात्र, ‘आर्मर पिअर्सिंग’ गोळ्यांच्या वापराचे संकेत मिळाले असले, तरी तपास पूर्ण झाल्यानंतरच त्‍याची औपचारिक पुष्टी होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सामान्‍य गोळ्‍यांच्‍या तुलनेत कैकपटीने घातक

‘आर्मर पिअर्सिंग बुलेटस्‌’ विशेषतः बुलेटप्रूफ जॅकेट, चिलखती गाड्या व सुरक्षा कवच भेदण्यासाठी बनवल्या जातात. यांच्या पुढच्या भागात बसवलेली अत्यंत कठीण धातूची (स्टील किंवा टंगस्टन) कोर सामान्य गोळ्यांच्या तुलनेत कैकपटीने अधिक घातक असते. कुलगाम हल्ल्यात या उच्च क्षमतेच्या गोळ्यांच्या वापरामुळे सुरक्षा व गुप्तचर यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे. याआधीही अनेक हल्ल्यांत काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी या अत्याधुनिक व घातक गोळ्या वापरल्‍या आहेत.

रणनीती बदलली

जम्मू-काश्‍मिरात सक्रिय दहशतवाद्यांनी घटनेनंतर तातडीने एका ठिकाणाहून दुसरीकडे पळून जाण्याऐवजी दीर्घकाळ सुरक्षित ठिकाणी लपून राहण्याचा मार्ग स्वीकारला आहे. दहशतवाद्यांचे हे ऑपरेशनल नेटवर्क सुरक्षा यंत्रणांसाठी नवे आव्हान बनत चालले आहे. गुप्तचर इनपुटनुसार, दहशतवादी मोबाईल फोनचा वापर टाळून जीपीएसआधारित नेव्‍हिगेशन उपकरणांच्या साहाय्याने ये-जा आणि सुरक्षित ठिकाणांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्या रणनीतीमध्ये दीर्घकाळ राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय आधीपासूनच उपलब्ध असलेल्‍या सुरक्षित ठिकाणांचे नेटवर्क अत्यंत महत्त्वाचे आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language