Hashtagintro

Navnath Ban : अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा, रोहित पवारांच्या साखर कारखान्याबाबत नवनाथ बन यांचा सवाल

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. रोहित पवार यांच्या शेटफळ गडे येथील साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुराचा बारामती विमानतळ परिसरातील दृश्यमानतेवर परिणाम झाला होता का, असा सवाल भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उपस्थित केला आहे. या कारखान्याचा अजित पवार यांच्या विमान अपघाताशी काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी उपस्थित होते.

साखर कारखान्याच्या धुरामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाल्याचा दावा
नवनाथ बन यांनी सांगितले की, बारामती विमानतळाजवळ ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या ठिकाणापासून सुमारे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर रोहित पवार यांचा शेटफळ गडे येथे साखर कारखाना आहे. या कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती आणि विमानतळ परिसरातील दृश्यमानता कमी झाली होती का, याची तपासणी होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
फेब्रुवारी महिन्यातील कमी तापमानामुळे धुराचे धुक्यात रूपांतर होऊन दृश्यमानतेवर परिणाम झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अपघाताच्या कारणांचा तपास करताना या मुद्द्याचाही विचार करावा, अशी मागणी बन यांनी केली. मात्र, साखर कारखान्याच्या धुराचा अपघाताशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केला नाही.

रोहित पवारांच्या आरोपांवरही उपस्थित केले प्रश्न
रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना रोहित सिंग यांच्यासोबतचा मफलरमधील फोटो दाखवला होता. यावर प्रतिक्रिया देताना बन म्हणाले की, रोहित सिंग यांची व्हीएसआर कंपनी 2013 पासून राज्य सरकार आणि विविध राजकीय नेत्यांना विमानसेवा पुरवत आहे. कंपनीचे पायलट आणि सहवैमानिक अनेक नेत्यांसोबत छायाचित्रे काढत असतात. मात्र, अशा छायाचित्रांवरून संबंधित नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही, असे त्यांनी म्हटले.
रोहित पवार यांनी आतापर्यंत अनेक पत्रकार परिषदा घेतल्या; मात्र रोहित सिंग किंवा व्हीएसआर कंपनीविरोधात ठोस पुरावे सादर केलेले नाहीत, असा दावाही बन यांनी केला. तसेच रोहित पवार यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, याचे स्पष्टीकरण पक्षाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित पवारांच्या राजकीय भूमिकेवर टीका
पत्रकार परिषदेत बन यांनी रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेवरही टीका केली. अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांकडून अशी प्रतिमा निर्माण केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारापूर्वीच सोशल मीडियावर त्यांच्या वारशाबाबत काही रील्स आणि स्लाइड्स प्रसारित करण्यात आल्याचा आरोप बन यांनी केला. या पोस्टमधून रोहित पवार हे अजित पवारांचा राजकीय आणि कामाचा वारसा पुढे नेतील, असा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले. यासंदर्भातील काही स्लाइड्सही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवल्या.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या कारणांबाबत अधिकृत तपासातून काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून उपस्थित करण्यात आलेले साखर कारखान्याच्या धुराचे कारण आणि रोहित पवार यांच्यावरील राजकीय आरोप हे नवनाथ बन यांनी केलेले दावे असून, त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language