Hashtagintro

Bhimashankar Temple: भीमाशंकर दर्शनाच्या वेळेत बदल नाही; वाहनांबाबतही निर्बंध नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका!

मंचर: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दर्शनाच्या वेळेत बदल होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. तसेच, डिंभे येथे सकाळी ९ वाजल्यानंतर भाविकांची वाहने अडविण्यात येणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

मात्र, या दोन्ही बाबींमध्ये तथ्य नसून दर्शन व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे देवस्थान ट्रस्ट आणि घोडेगाव पोलिसांनी स्पष्ट केले आहे. भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पहाटे ५ ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत खुले असते. मात्र, दर्शनाच्या वेळेत कपात करून केवळ पहाटे ५ ते सकाळी ९ या कालावधीतच दर्शन मिळणार असल्याचा संदेश प्रसारित झाल्याने भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

याबाबत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे आणि घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दर्शनाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांकडूनही दर्शनाच्या वेळेत बदल करण्याबाबत किंवा वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेले नाहीत.

सध्या सुट्यांमुळे राज्यासह देशाच्या विविध भागांतून भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येत आहेत. अशा परिस्थितीत चुकीचे संदेश प्रसारित झाल्यास भाविकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे अधिकृत माहितीशिवाय समाजमाध्यमांवरील संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भीमाशंकर मंदिरातील दर्शनाच्या वेळेत बदल करण्याबाबत किंवा सकाळी नऊनंतर भाविकांची वाहने थांबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. दर्शन व्यवस्था नियमित सुरू आहे. अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील माहिती दिली जाईल. त्यामुळे भाविकांनी समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी केले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language