Hashtagintro

Bombay High Court | कॅसिनोमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून गंभीर दखल

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजीतील डी. बी. बांदोडकर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या समस्येची स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायालयाने या मार्गावरील अनेक ठिकाणी पार्किंगवर कडक निबंध घालण्याचे अंतरिम निर्देश दिले आहेत.

या निर्देशांची अंमलबजावणी कितपत झाली, याचा अहवाल चार आठवड्यात सादर करण्यास संबंधित यंत्रणांना सांगण्यात आले आहे. दिवजा सर्कलपासून नदीकाठावरील फेरी पॉईंटपर्यंत योग्य ठिकाणी बॅरिकेडिंग करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी सहा ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग स्पष्टपणे आखण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरणाऱ्या अनधिकृत आणि रस्त्यालगतच्या पार्किंगवर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. पेट्रोल पंप परिसरापासून पणजी चर्चपर्यंत पार्किंग बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

एआयद्वारे नंबर प्लेटवर पाळत

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित नंबर प्लेट ओळख प्रणालीद्वारे वाहनांवर पाळत ठेवण्याची व्यवस्था बळकट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

नो पार्किंगमधील वाहने उचलण्याचे निर्देश

नो पार्किंग क्षेत्रात उभी केलेली दुचाकी वाहने वाहतूक पोलिसांच्या मदतीने पणजी महापालिका हटवते. चारचाकी वाहने उचलण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा उपलब्ध नसल्यास ती भाडेतत्त्वावर घेऊन कारवाई करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

रात्री ९ वाजेपर्यंत पोलिस तैनात

या मार्गावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी रात्री ९ वाजेपर्यंत पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. विशेषतः, गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रण आणि पार्किंग निबंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर असेल.

कॅसिनोच्या वाहनांसाठी स्वतंत्र ड्रॉप-ऑफ पॉईंट

कॅसिनोत येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे मुख्य मार्गावर होणारी गर्दी टाळण्यासाठी न्यायालयाने स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. कॅसिनोत येणाऱ्यांनी जुन्या फाजेन विभागाजवळ निश्चित केलेल्या ड्रॉप-ऑफ पॉईंटचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहने थांबवून प्रवाशांना उतरवण्याचे प्रकार कमी होण्यास मदत होईल.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language