Hashtagintro

Chandrapur Loan Recovery | कर्ज हप्त्याच्या थकबाकीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी घरातून नेली चिमुकल्याची सायकल

Brahmapuri Loan Recovery Harassment

चंद्रपूर :   कर्जाचा हप्ता थकल्याने बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी थेट कर्जदाराच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाची सायकलच उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथे उघडकीस आला आहे. अवघ्या २ हजार ३९० रुपयांच्या थकीत हप्त्यासाठी मुलाच्या वापरातील सायकल नेल्याचा आरोप करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची प्रहार संघटनेने गंभीर दखल घेत संबंधित ॲक्सिस बँक प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चौगान येथील संगीता सूर्यवंशी यांनी ॲक्सिस बँकेकडून ४५ हजार रुपयांचे ग्रुप कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जाचा २ हजार ३९० रुपयांचा हप्ता थकीत असल्याने बँकेचे वसुली कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी कुटुंबातील मुलाची सायकल घरातून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली थेट मुलाच्या वापरातील वस्तू नेण्याच्या या कथित प्रकारामुळे बँकेच्या वसुली पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पांडव यांनी या घटनेचा निषेध केला असून, संबंधित बँक कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

एकीकडे राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत असताना, दुसरीकडे कर्जाच्या हप्त्यासाठी अशा प्रकारे कुटुंबातील मुलाच्या वस्तू नेण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्जवसुलीसाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना अशा प्रकारे कारवाई करण्याचा अधिकार बँक कर्मचाऱ्यांना आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या घटनेची दखल घेऊन बँक प्रशासन संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार आणि मुलाची सायकल परत मिळणार का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language