Hashtagintro

Chhatrapati Sambhajinagar father throws children in canal|चॉकलेट-वडापावचे आमिष, वडिलाने २ चिमुकल्यांना कालव्यात फेकले!

पाचोड (छत्रपती संभाजीनगर) : वडिलांच्या कुशीत मुलं स्वतःला सगळ्यात सुरक्षित समजतात. पण पैठण तालुक्यातील नांदर गावात मात्र वडिलांच्या हातून दोन निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चॉकलेट आणि वडापावचे आमिष दाखवून मुलांना स्कुटीवर बसवून नेले आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात फेकून दिले.

सोमवारी (ता. १६) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. नांदर येथील सोमनाथ दामोदर रोडगे (वय ४०) याने सायंकाळच्या वेळी आपली दोन मुले श्याम (५) आणि आर्यन (७) यांना जवळ बोलावले. चला रे, आज वडापाव खाऊ, चॉकलेट घेऊ, मस्त फिरून येऊ, असे सांगून त्याने दोघांना आपल्या स्कुटीवर बसवले.

बापासोबत फिरायला मिळणार म्हणून दोन्ही चिमुकले खूप खुश झाले. त्यांना काय माहीत, हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरणार आहे. सोमनाथने स्कुटी थेट जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर नेली. कालव्याच्या काठावर गेल्यावर त्याने दोन्ही मुलांना एकापाठोपाठ एक पाण्यात फेकून दिले. “पप्पा… असं करू नका ना, आम्ही मरू…” असं म्हणत दोन्ही चिमुकले जीवाच्या आकांताने ओरडत होते, हात जोडत होते. मात्र त्या निर्दयी बापाचे काळीज अजिबात पाझरले नाही. क्षणात दोन्ही निरागस जीव कालव्याच्या पाण्यात गडप झाले.

गावावर शोककळा

या घटनेमुळे नांदर गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. ज्या वडिलाने मुलांना जन्म दिला, त्याच वडिलाने त्यांचा घात केला, ही गोष्ट गावकऱ्यांना अजूनही पटत नाही. दोन निरागस जीवांनी काय बिघडवलं होतं? त्यांची काय चूक होती? असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहे. एका बाजूला आईचा आक्रोश थांबत नाही. तर दुसऱ्या बाजूला गावकरी कालव्याकाठी मुलांचा शोध घेत आहेत. या क्रूरकृत्यामागील नेमकं कारण काय? कौटुंबिक वाद होता का? आर्थिक अडचण होती का? की आणखी काही? याचा तपास पाचोड पोलिस करत आहेत.

पोलिसांसमोर कबुली

सुरुवातीला सोमनाथने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मुलं कुठे आहेत माहीत नाही, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच दोन्ही मुलांना कालव्यात फेकल्याचे त्याने सांगितले. या कबुलीनंतर पोलिसांनी तत्काळ कालव्यात शोधमोहीम सुरू केली. रात्रीपासून पोलिस, नातेवाईक आणि गावकरी कालव्याच्या काठाकाठाने दोन्ही चिमुकल्यांचा शोध घेत आहेत. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने अद्याप दोन्ही मुलांचा शोध लागलेला नाही. शोधमोहीम अजूनही सुरू आहे.

शेतकऱ्यांचा थांबवण्याचा प्रयत्न, पण…

त्याचवेळी कालव्यावर आपले विद्युत पंप सुरू करण्यासाठी काही शेतकरी आले होते. त्यांनी हा भयंकर प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला. अरे, काय करतोयस? वेडा झालास का? ही तुझीच पोटची मुलं आहेत, असे म्हणत त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमनाथने उलट त्यांच्यावरच दगडफेक केली, शिवीगाळ केली आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ पाचोड पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि सोमनाथ रोडगे याला ताब्यात घेतले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language