Hashtagintro

Damini Palav Murder Case : खुनात वापरलेला चाकू, दुचाकी व मोबाईल जप्त

कुडाळ : कुडाळ तालुक्या­­­­­तील वर्दे खालची पालववाडी येथील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव (२३) हिच्या निर्घृण खून प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. तिचा खून करण्यासाठी संशयित साहिल विश्राम धुरी (२२, रा. मठ, ता. वेंगुर्ले) याने वापरेला धारदार चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व दामिनी आणि साहिल या दोघांचे मोबाईलही ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी विकास बडवे यांनी दिली.

वर्दे खालची कुंभारवाडी येथील सायल्याच्या ओहळानजीक शनिवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास ही घटना घडली होती. दामिनी हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात एकतर्फी प्रेमातून खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी तपासातून वर्तवला आहे.

घटनेनंतर संशयित साहिल याने घटनास्थळावरून पळ काढला होता. तो थेट मठ येथील आपल्या घरी गेला. दरम्यान, संशयिताचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा माग काढला. अवघ्या पाच तासांत पथकाने त्याला घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर कुडाळ पोलिसांनी त्याला अटक केली.

रविवारी संशयिताला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी संशयिताला घटनास्थळी नेऊन चौकशी केली. यावेळी गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला. तसेच दुचाकी आणि दोघांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच सोमवारी मोबाईल फाॅरेन्सीक व्हॅन पथकानेही घटनास्थळी जाऊन तपास केला.

प्रेमप्रस्तावाला नकार दिल्याचा राग?

दामिनी ही कुडाळ तालुक्यातील एका काॅलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होती. संशयित साहिल हा गोव्यातील हॉटेलमधील नोकरी सोडून गावी आला होता. दोघांची काही दिवसांपासून ओळख होती. या ओळखीतून साहिलने दामिनीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र तिने नकार दिल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणातील नेमकी पार्श्वभूमी आणि घटनाक्रमाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language