Hashtagintro

Dengue Prevention | डासच घेणार डासांचा बदला : डेंग्यूविरुद्ध आलं नवं ‘अस्त्र’

रिओ डी जानेरिओ : ‘काट्यानेच काटा काढतात’ असे म्हटले जाते; आता शास्त्रज्ञांनीही याच मार्गावर पाऊल टाकले आहे. ब्राझीलमधील शास्त्रज्ञांनी डेंग्यूशी लढण्यासाठी एका नवीन पद्धतीची यशस्वी चाचणी केली आहे. या पद्धतीत ना डासांना मारले जाईल, ना त्यांच्या चावण्यापासून वाचण्यासाठी नेहमीचे उपाय केले जातील. याउलट, डासांना एका विशिष्ट बॅक्टेरियाने (जीवाणूने) संक्रमित केले जाईल, ज्यामुळे त्यांच्या शरीरात डेंग्यूसारख्या विषाणूंची वाढ होणे कठीण होईल. जगातील प्रमुख डेंग्यू हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या ब्राझीलमध्ये हजारो मुलांवर केलेल्या या मोठ्या अभ्यासाचे सकारात्मक निकाल शास्त्रज्ञांनी शनिवारी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केले.

संशोधकांच्या पथकाने लाखोंच्या संख्येने असे डास निसर्गात सोडले, ज्यांच्यामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा ‘वोल्बाचिया’ (Wolbachia) नावाचा बॅक्टेरिया सोडण्यात आला होता. हा बॅक्टेरिया डासांच्या शरीरात डेंग्यू विषाणूची वाढ रोखतो. या चाचणीतून असे दिसून आले की, यामुळे डेंग्यूच्या संसर्गात ६८.५ टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे. मानवांमध्ये पसरणारे आजार रोखण्यासाठी डासांमध्येच जनुकीय किंवा जैविक बदल करण्याचा हा सर्वात ताजा प्रयत्न आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात सध्या १९४० च्या दशकानंतरचा सर्वात मोठा डेंग्यूचा उद्रेक पाहायला मिळत असतानाच या संशोधनाचे निकाल समोर आले आहेत.

बोस्टन युनिव्हर्सिटीचे जागतिक आरोग्य तज्ज्ञ डेव्हिड हॅमर यांनी सांगितले की, ‘‘हे खरोखरच अत्यंत उत्साहवर्धक आहे. वोल्बाचियायुक्त डासांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास अनेक भागांत डेंग्यूचे प्रमाण खूप कमी होऊ शकते.’’ ब्राझीलचे आरोग्य मंत्रालय, अमेरिकेतील एमोरी आणि येल युनिव्हर्सिटी तसेच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजेस’च्या आंतरराष्ट्रीय पथकाने २०२० ते २०२४ दरम्यान आग्नेय ब्राझीलमधील बेलो होरिझोंटे शहरात हा अभ्यास केला. शास्त्रज्ञांनी ‘एडिस इजिप्ती’ डासांना ‘वोल्बाचिया’ या नैसर्गिक बॅक्टेरियाने संक्रमित केले. हा बॅक्टेरिया मानवांना कोणतीही हानी पोहोचवत नाही, परंतु डासांची विषाणू पसरवण्याची क्षमता लक्षणीयरीत्या कमी करतो.

निसर्गातील सुमारे ५० टक्के कीटकांमध्ये हा बॅक्टेरिया असतो, मात्र डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका आणि यलो फीव्हर पसरवणाऱ्या एडिस इजिप्ती डासांमध्ये तो नैसर्गिकरीत्या नसतो. संशोधकांनी हे डास सोडल्यानंतर ५,७०० मुलांची डेंग्यूच्या लक्षणांसाठी रँडम चाचणी केली. यामध्ये वोल्बाचियायुक्त डास सोडलेल्या भागातील मुले आणि कीटकनाशक फवारणीसारख्या पारंपरिक पद्धती वापरल्या जाणाऱ्या भागातील मुलांचा समावेश होता. संशोधकांनी लक्षणे नसलेल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी डास, गोचिड आणि सँडफ्लायपासून पसरणाऱ्या इतर अनेक आजारांच्याही चाचण्या केल्या. ज्या भागात वोल्बाचियायुक्त डास सोडले गेले होते, तिथे केवळ ४ टक्के नियमित रक्तचाचण्या पॉझिटिव्ह आल्या, तर इतर भागांत हे प्रमाण १४ टक्के होते. या अभ्यासात असे आढळून आले की, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ६८.५ टक्के, तर चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये ७३.३ टक्के घट झाली आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language