Hashtagintro

Devram Lande Resignation: कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप प्रकरणाला राजकीय वळण; देवराम लांडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ व व्हिडिओ क्लिप प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

या प्रकरणामागे राजकीय विरोधकांचे षडयंत्र असण्याची शक्यता असून, त्याद्वारे आपली वैयक्तिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना त्यांनी राजीनामापत्रात व्यक्त केली आहे.

मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू नये तसेच पक्षाला कोणतीही राजकीय अडचण निर्माण होऊ नये, या भूमिकेतून चौकशी पूर्ण होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्ष कोणत्याही अनुचित प्रकाराचे समर्थन करणार नसून, संबंधित प्रकरणाची पोलिस प्रशासन व संबंधित विभागामार्फत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, या उद्देशाने देवराम लांडे यांनी राजीनामा दिल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पोलिसांच्या चौकशीतून नेमकी काय वस्तुस्थिती समोर येते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language