Hashtagintro

England Child Exploitation Case | इंग्लंडमध्ये ७० मुलींचे शोषण; मुंबईच्या तरुणाला सक्‍तमजुरी

लंडन; वृत्तसंस्था : ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या मुंबईच्या एका २७ वर्षीय तरुणाला तेथील न्यायालयाने ३० वर्षांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. बिलाल काझी असे या नराधमाचे नाव असून, त्याने सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून ब्रिटनमधील किमान ७० अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढले आणि त्यांचे लैंगिक शोषण केले. चेस्टर क्राऊन कोर्टाने शुक्रवारी हा निकाल दिला.

बिलाल काझी हा युनिव्हर्सिटी ऑफ चेस्टर आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅममध्ये रसायनशास्त्रात पीएच.डी. करत होता. २०२१ ते २०२५ या काळात त्याने स्नॅपचॅट, विंक आणि रोब्लॉक्स यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर स्वतःची ओळख लपवली. आपण १४ वर्षांचा गोरा ब्रिटिश मुलगा असल्याचे भासवून त्याने १० ते १७ वयोगटातील मुलींशी मैत्री केली. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याने मुलींकडून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ मागवून घेतले. नंतर तेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आणि ब्लॅकमेल करत त्याने मुलींना आणखी अश्लील साहित्य पाठवण्यास भाग पाडले व त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याचे चित्रीकरण करून छायाचित्रेही काढली.

तपासाची चक्रे आणि अटक

डिसेंबर २०२१ मध्ये एका १३ वर्षीय पीडित मुलीने डर्बिशायर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पुढे मे २०२२ मध्ये चेशायर कॉन्स्टेबुलरीच्या ऑनलाईन चाईल्ड अब्यूज इन्व्हेस्टिगेशन टीमने याचा तपास हाती घेतला. ब्रिटन सोडून गेलेल्या काझीला जुलै २०२३ मध्ये हिथ्रो विमानतळावर परतताच अटक करण्यात आली. त्याच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीत १८० संभाव्य पीडितांची माहिती समोर आली. त्यापैकी २८ पोलिस दलांच्या हद्दीतील ७० मुलींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

आरोपीने दिली ३७ आरोपांची कबुली

न्यायालयात काझीने ब्लॅकमेलिंग, अश्लील चित्रण तयार करणे आणि बालकांना लैंगिक कृत्यास प्रवृत्त करणे यांसारख्या ३७ आरोपांची कबुली दिली. न्यायालयाने त्याला ३० वर्षांची शिक्षा सुनावली असून पॅरोलसाठी पात्र होण्यापूर्वी त्याला किमान २० वर्षे तुरुंगात काढावी लागतील. याशिवाय त्याचे नाव आयुष्यभर ‘सेक्स ऑफेंडर्स रजिस्टर’मध्ये नोंदवले जाईल. काझीच्या कृत्यामुळे कोवळ्या मुलींच्या आयुष्यावर खोल मानसिक आघात झाला असून या शिक्षेमुळे पीडितांना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया तपास अधिकारी जॉर्जिया ह्यूजेस यांनी व्यक्त केली आहे.

आरोपीचे नाव : बिलाल काझी (वय २७, मूळचा मुंबईचा रहिवासी)

गुन्ह्याचा कालावधी : २०२१ ते २०२५ दरम्यान सोशल मीडिया व गेमिंग ॲप्सचा वापर

शिक्षा : ३० वर्षांचा तुरुंगवास, किमान २० वर्षे पॅरोल नाही आणि आयुष्यभर लैंगिक गुन्हेगारांच्या यादीत नाव

पीडितांची संख्या : ब्रिटनच्या १० ते १७ वयोगटातील किमान ७० अल्पवयीन मुली

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language