Hashtagintro

Five Vehicles Burnt | बिळवस येथे घरासह पाच वाहने जळून खाक

मालवण : मालवण तालुक्यातील बिळवस भोगलेवाडी येथे गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुनील सोमा भोगले यांच्या बंद घराला भीषण आग लागून संपूर्ण घरासह आवारात उभी असलेली पाच वाहने जळून खाक झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य, वाहने व अन्य मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने घटनेच्या वेळी भोगले कुटुंबीय मुंबईत असल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ व मालवण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मालवण-बागायत मार्गावरील बिळवस भोगलेवाडी येथील रहिवासी सुनील सोमा भोगले हे पत्नी व मुलांसह कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की घरातील संसारोपयोगी साहित्याबरोबरच आवारात उभी असलेली पाच वाहनेही जळून खाक झाली. यामध्ये कार, रिक्षा, स्कूटर आदी वाहनांचा समावेश आहे.

आगीची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मालवण नगरपरिषदेचा अग्निशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला. ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या जवानांनी संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे शेजारील घरांना आगीची झळ बसण्याचा धोका टळला. या भीषण आगीत भोगले कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच सुनील भोगले हे मुंबईहून गावी येण्यासाठी रवाना झाले असून, ते सायंकाळपर्यंत गावी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर नुकसानीची अधिक माहिती समोर येणार आहे. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language