Hashtagintro

Graduate & Teachers Constituency Election | ‘पदवीधर’, ‘शिक्षक’साठी आज मतदान

कोल्हापूर : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) मतदान होत आहे. पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात २१२ मतदान केंद्रांवर १ लाख १४ हजार ५६२ तर शिक्षक मतदारसंघासाठी ७० मतदान केंद्रांवर १२ हजार २९९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

या मतदानासाठी जिल्ह्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी सकाळी मतदान केंद्रांवर मतदान कर्मचाऱ्यांसह मतदान साहित्य रवाना झाले. दुपारनंतर कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर सर्व तयारीस सुरुवात केली. सायंकाळपर्यंत बहुतांश मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून सर्व २८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग प्रक्रिया राबवली जाईल. पदवीधरसाठी १,३८० तर शिक्षकसाठी ४५५ मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एकूण प्रक्रियेवर १३० सूक्ष्म निरीक्षक व २८२ वैद्यकीय कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

चार तासांची पगारी रजा

खासगी आस्थापना, कंपन्या, मॉल्स, दुकाने व अन्य आस्थापनांना या निवडणुकीसाठी पात्र मतदार कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष पगारी रजा देणे बंधनकारक आहे. या वेळेतील वेतन कापता येणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त सु. तु. शिर्के यांनी स्पष्ट केले.

योग्य पद्धतीने पसंती क्रमांक द्या : विभागीय आयुक्त

कोल्हापूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे. ही पद्धत जाणून योग्यरीतीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी मतदारांना केले आहे.

मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त ओळख पटविण्यासाठी पुढीलपैकी कोणताही एक पुरावा आवश्यक…

आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, राज्य/ केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्था. स्व. संस्था किंवा इतर खासगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील मतदारांना ते कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थांचेे सेवा ओळखपत्र, विद्यापीठाचे मूळ पदवी प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र.

असे करा मतदान

मतपत्रिकेबरोबर दिलेल्या जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरा. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन वापरू नका. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर १ असा आकडा लिहा. १ आकडा एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्या. तो एकाच वेळी वापरता येईल.

उमेदवार असतील तेवढे पसंतीक्रम देता येतील. उमेदवाराच्या नावासमोर एकच आकडा घातला आहे आणि तो अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला नाही याची खात्री करा. पसंतीक्रम १, २, ३ असा लिहा. एक, दोन, तीन असे लिहू नका. पसंतीक्रम 1, 2, 3 अशा किंवा I, II, III अशा रोमन किंवा १, २, ३ अशा देवनागरी रूपात देता येतील. मतपत्रिकेवर नाव, आद्याक्षरे किंवा अन्य शब्द लिहू नयेत. स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवू नका. पसंतीक्रमासाठी √ किंवा X अशी खूण नको. पसंतीक्रम अंकातच द्यावा. एक अंक लिहिणे बंधनकारक. त्यापुढील अंक ऐच्छिक असेल.

या मतपत्रिका ठरतील अवैध

पसंतीचा १ हा आकडा नसल्यास.

१ आकडा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातल्यास.

१ आकडा, कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातला, याबाबत शंका निर्माण होईल असा घातलेला असेल.

एकाच उमेदवाराच्या नावासमोर १ आणि २, ३ आकडे घातल्यास.

पसंतीक्रम शब्दांमध्ये दर्शवल्यास.

ओळख पटू शकेल, अशी खूण किंवा लेखन व जांभळ्या स्केच पेनशिवाय अन्य साधनाने आकडा घातल्यास.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language