
दोहा येथे खेळल्या जात असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारत आणि पाकिस्तान ‘अ’ संघ आमने-सामने आले आहेत. सामन्याच्या सुरुवातीच्या षटकांमध्येच मैदानावर एक भीतीदायक दृश्य घडले, जेव्हा चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात वैभव सूर्यवंशी आणि विप्रज निगम हे दोन तरुण भारतीय खेळाडू सीमारेषेजवळ समोरासमोर धडकले. या धडकेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी गंभीर दुखापतीतून थोडक्यात बचावला.
सामन्यात पाकिस्तान ‘अ’ संघाचा कर्णधार अब्दुल समदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शमिम हुसेनने पाकिस्तान ‘अ’ संघाला वेगवान सुरुवात करून दिली, तर दुसऱ्या टोकाला माज सदाकत फलंदाजी करत होता. ही घटना पाकिस्तानच्या डावातील तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर घडली. माज सदाकतने भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या एका लेंथ बॉलवर ऑन-साइडच्या दिशेने जोरदार फटका मारला आणि चेंडू स्क्वेअर लेगवरून सीमारेषेच्या दिशेने गेला.
मग स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात असलेले दोन भारतीय क्षेत्ररक्षक वैभव सूर्यवंशी आणि विप्रज निगम चेंडूच्या मागे धावले. सीमारेषेजवळ चेंडू अडवण्यासाठी विप्रज निगमने झेप घेतली. पण त्याचा पाय धावणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या डोक्याला लागला. ज्यामुळे दोघांची टक्कर झाली. तो आघात इतका जोरदार होता की, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी वेदनेने आपला खांदा धरून लगेच खाली बसला.
सुरुवातीला ही दुखापत गंभीर वाटल्याने भारतीय संघ आणि चाहते चिंतेत पडले होते. मात्र दिलासादायक बाब ही होती की, काही सेकंदातच वैभव सावरला आणि त्याने केवळ क्षेत्ररक्षणच सुरू ठेवले नाही, तर तो पूर्णपणे दुखापतमुक्त असल्याचेही दिसून आले. अशाप्रकारे भारतीय संघाने एक मोठा प्रसंग थोडक्यात टाळला.
इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए प्लेइंग इलेवन
भारत ए (प्लेइंग इलेवन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), रिंकू सिंह, सूर्यांश शेडगे, शाहबाज़ अहमद, विप्रज निगम, हर्षित राणा, प्रिंस यादव
पाकिस्तान ए (प्लेइंग इलेवन): शमील हुसैन, माज सदाकत, रोहेल नजीर (विकेटकीपर), हसन नवाज़, अब्दुल समद (कर्णधार), फरहान यूसुफ, साद मसूद, मोहम्मद इमरान रंधावा, अहमद दानियाल, सुफयान मोकिम, अली रजा
Source: TV9 Marathi Sports
