प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सन टीव्ही नेटवर्कच्या कार्यकारी संचालक काव्या मारन यांच्या विवाह सोहळ्याची सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा विवाह ११ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रीसमध्ये अत्यंत मोजक्या आणि जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार असून, हा दोन दिवसांचा १० आणि ११ नोव्हेंबर खासगी सोहळा असणार आहे. यानिमित्ताने काव्या मारन कोण आहे जाणून घेऊया
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाला पाठिंबा देणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी काव्या मारन एक ओळखीचा चेहरा आहे. अनेकदा स्टँड्समधून संघाला प्रोत्साहन देताना काव्या दिसते. मात्र, तिची ओळख ही फक्त सामन्याच्या दिवशी उपस्थित राहण्यापुरती मर्यादित नाही. तिचे शिक्षण, कौटुंबिक व्यवसायातील तिची भूमिका आणि भारतातील एका प्रमुख मीडिया समूहाशी असलेला तिचा संबंध, तिच्या व्यावसायिक प्रवासावर अधिक जवळून प्रकाश टाकतात. मिळालेल्या माहितीनुसार, काव्याने चेन्नईतील स्टेला मारिस कॉलेजमधून बॅचलर ऑफ कॉमर्स ही पदवी घेतली. त्यानंतर युनायटेड किंगडममधील वोर्विक बिझनेस स्कुलमध्ये एमबीए केले. तिच्या शैक्षणिक प्रवासात वाणिज्य शाखेतील पदवी आणि व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षणाचा समावेश होता. २०१९ मध्ये काव्या सन टीव्ही नेटवर्कमध्ये कार्यकारी संचालक म्हणून रुजू झाली आणि कंपनीशी जोडली गेली. नंतर ती सनरायजर्स हैदराबादच्या माध्यमातून कौटुंबिक क्रीडा व्यवसायात एक प्रमुख व्यक्ती म्हणून उदयास आली. ही फ्रँचायझी तिचे वडील कलानिधी मारन यांनी २०१७ मध्ये विकत घेतली होती. काव्याच्या सहभागामुळे विशेषतः आयपीएल सामन्यांदरम्यान ती संघाची एक प्रमुख प्रतिनिधी बनली आहे. अहवालांनुसार काव्या मारन यांची वैयक्तिक एकूण संपत्ती सुमारे ४०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, परंतु ही माहिती अधिकृतपणे जाहीर न झाल्यामुळे तिची पडताळणी करता येत नाही. काव्याचे वडील, कलानिधी हे सन टीव्ही नेटवर्कशी संबंधित एक प्रमुख भारतीय मीडिया उद्योजक आहेत. अहवालानुसार त्यांची अंदाजित संपत्ती २४,६०० कोटी रुपये असून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा १४६ वा क्रमांक लागतो.Source: Prahaar News