अनिल साक्षी
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात दोन विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर पोलिसांनी वाँटेड दहशतवाद्यांची पोस्टर्स प्रसिद्ध केली आहेत. या दहशतवाद्यांच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याला ३० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. श्रीनगरमधील लाल चौक आणि प्रताप पार्क परिसरातही चार वाँटेड दहशतवाद्यांची पोस्टर्स लावली असून त्यांच्या हालचालींबाबत माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम दच्छन-मरवाह जंगल परिसरात ११ नोव्हेंबर रोजी कर्तव्यावर जात असताना एसपीओ रशपाल कुमार (४५) आणि बाबी चंद (५७) बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशी या दोघांचे गोळ्यांनी चाळण झालेले मृतदेह आढळून आले. त्यांच्याकडील सर्व्हिस रायफल गायब होत्या. किश्तवाडच्या दुर्गम भागात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहांगीर सरूरी याच्यासह १० ते १२ दहशतवादी सक्रिय असण्याची शक्यता आहे. सरूरीचे साथीदार रियाज अहमद ऊर्फ हजारी आणि मुदस्सिर हुसेन यांचाही शोध सुरू आहे.
स्थानिकांच्या माहितीवर भर
दहशतवाद्यांच्या हालचाली आणि त्यांच्या नेटवर्कचा माग काढण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मिळणाऱ्या गोपनीय माहितीला सुरक्षा यंत्रणा महत्त्व देत आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून संशयितांची ओळख सार्वजनिक करून त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Source: Pudhari News
