मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातही तब्बल ६६०० कोटी रुपयांची कामे सिमेंटी काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. मुंबईतील रस्ते विकासातील सिमेंट काँक्रिटीकरण कामाची ही शेवटची निविदा असून यानंतर रस्ते कामाच्या निविदा निघणार नाही. त्यामुळे आता काँक्रिटीकरणाच्या रस्ते कामांवर शेवटचा हात महापालिका फिरवणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत २,११८ रस्त्यांचे (लांबी ६९१.०८ किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यापैकी १,१७० रस्त्यांचे (लांबी ३१६.८४ किलोमीटर) संपूर्ण लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तर ५५९ रस्त्यांचे संगमस्थान ते संगमस्थान (१७१.४० किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण आहे. अशाप्रकारे एकूण ६९१.०८ किलोमीटर पैकी ४८८.२४ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण म्हणजेच ७१ टक्के काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ३८९ रस्त्यांचे (१०२.०४ किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम आता ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/04/threat-of-unseasonal-rain-in-maharashtra-showers-likely-in-konkan-western-maharashtra-and-marathwada/
तर आता तिसऱ्या टप्प्यात उर्वरीत सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांची ही शेवटची निविदा असल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत रस्त्यांची यादी अंतिम झाली असून त्यांचे आराखडेही मंजूर झाल्याने त्यानुसार एकूण ६६०० कोटी रुपयांच्या निविदा मागवण्यात येणार आहे. या निविदा मागवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा निमंत्रित केली जाणार आहे. मात्र, पहिल्या दोन टप्प्यामध्ये शहर आणि पूर्व उपनगरासाठी प्रत्येक एक आणि पश्चिम उपनगरासाठी तीन अशाप्रकारे एकूण ५ कंत्राटदारांची निवड करण्यात आली होतीि. परंतु मागील दोन टप्प्यातील कामांचा अनुभव लक्षात घेता आता वॉर्डनिहाय कंत्राट मागवून या कामांना गती देत त्याचा चांगला दर्जा राखला जावा अशाप्रकारची मागणी होत आहे. त्यामुळे प्रशासन पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणेच निविदा मागवते की यापूर्वीच्या कामांमध्ये बदल करत वॉर्ड निहाय कंत्राट मागवते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Source: Prahaar News
