मुंबई : महाविद्यालयांमधील अस्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांवर प्रश्न उपस्थित केल्याने मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यावरच कारवाईची नोटीस बजावण्यात आल्याने सोमवारी विद्यापीठात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या दहा आमदारांनी विद्यापीठात जाऊन या कारवाईचा जाब विचारला.
अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील सुविधांचा अभाव आणि अस्वच्छतेचे प्रश्न सातत्याने उपस्थित केले आहेत. विशेषतः जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधील कॅन्टीन, स्वच्छतागृहे आणि वर्गखोल्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा त्यांनी पुढे आणला होता. याशिवाय दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण विभागाच्या कारभाराबाबतही त्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
या कारवाईच्या निषेधार्थ आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार अनिल परब, अजय चौधरी, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, ज. मो. अभ्यंकर, सुनील शिंदे, मनोज जामसुतकर, अनंत नर आणि महेश सावंत या आमदारांनी विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील मुख्यालयात जाऊन कुलगुरूंची भेट घेतली. कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासमोर आमदारांनी या नोटिशीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी अधिसभा सदस्य राजन कोळंबेकर उपस्थित होते.
विद्यापीठात पोहोचल्यानंतर आमदारांची विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून साधी विचारपूसही झाली नसल्याचा मुद्दा ठाकरे यांनी उपस्थित केला. या प्रकाराबद्दल हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रदीप सावंत यांच्यावरील नोटीस दहा दिवसांत मागे घेऊन विद्यापीठाने दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा कुलगुरूंनाच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आदित्यसह आमदारांना गोडाऊनमध्ये बसवले
-
कुलगुरूंना भेटायला गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना धक्कादायक वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुलगुरूंना भेटायला गेलेल्या या आमदारांना आधी चक्क एका गोडाऊनमध्ये बसवण्यात आले आणि त्यानंतर बैठकीच्या वेळी पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने विद्यापीठ परिसरात चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
-
कोणत्याही वस्तुस्थितीची पडताळणी न करता अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी वारंवार विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणारी वृत्ते प्रसिद्ध केल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पूर्वपरवानगी न घेता प्रवेश करून बांधकाम सुरू असलेल्या अथवा दुरुस्तीच्या ठिकाणांची छायाचित्रे काढण्यात आली आणि त्याआधारे दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. संबंधित संस्थेत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
Source: Pudhari News
