Hashtagintro

Nanded News | गोदावरी नदीपात्रातील वाळूमाफियांवर नांदेड पोलिसांचा जबरदस्त प्रहार!

नायगाव : गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळूचा उपसा करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या आणि पर्यावरणाची अपरिमित हानी करणाऱ्या वाळूमाफियांविरुद्ध नांदेड पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहिण यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मुदखेड व उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एकाच वेळी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचा जागीच नाश करण्यात आला पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहण यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) सकाळी सुमारे ७ वाजता ही विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस उपअधीक्षक रमेश बेंजणे (नांदेड शहर), पोलीस उपअधीक्षक शाम पानगावकर (बिलोली) आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक नदीपात्रात उतरले. मुदखेड व उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणांवर अचानक छापे टाकण्यात आले.

या कारवाईत वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या व छोट्या बोटी, इंजिन, हायवा वाहने तसेच साठविलेली रेती असा मोठा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या काही यंत्रसामग्रीचा जिलेटिनच्या कांड्यांचा वापर करून जागीच स्फोट घडवून नाश करण्यात आला.

पोलिसांनी जप्त केलेला मुद्येमाल

१० मोठ्या लोखंडी बोटी – प्रत्येकी ३० लाख रुपये, एकूण ३ कोटी रुपये.

४ छोट्या बोटी – प्रत्येकी १५ लाख रुपये, एकूण ६० लाख रुपये.

२ इंजिन – ५ लाख रुपये.

४ हायवा वाहने – एकूण १ कोटी ६० लाख रुपये.

५० ब्रास रेती – एकूण २ लाख ५० हजार रुपये.

वाळूमाफियांना आता कायद्याचा दणका!

गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून नैसर्गिक संपत्तीची लूट करणाऱ्यांविरुद्ध आता केवळ दंडात्मक कारवाई न करता कठोर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मुदखेड आणि उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळूमाफिया, चालक आणि वाहनमालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहण यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव व अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक रमेश बेंजणे, शाम पानेगावकर आणि वैभव पडवळ यांच्यासह मुदखेड व उस्माननगर येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच क्यूआरटी व आरसीपी पथकातील जवानांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language