Hashtagintro

Nashik : पहाटे हुडहुडी, दुपारी उन्हाचा चटका ! नाशिकच्या हवामानात मोठा बदल

नाशिक : नाशिक जिल्ह्यात हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला असून, पहाटेच्या वेळी नागरिकांना चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. विशेषतः निफाड परिसरात तापमानाचा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. गुरुवारी (दि. 12 नोव्हेंबर) निफाडमध्ये किमान तापमान 11.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर नाशिक शहरात तापमान 13.9 अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे जिल्ह्यात आता गुलाबी थंडीचे आगमन झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानात चढ-उतार सुरू आहेत. मात्र, किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा अनुभव अधिक तीव्र होत आहे.

नाशिक शहराच्या तापमानात तीन दिवसांत घट
नाशिक शहरातील किमान तापमानाचा विचार केला, तर 10 नोव्हेंबर रोजी 14.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 11 नोव्हेंबरला तापमान घसरून 14.2 अंशांवर आले. त्यानंतर गुरुवारी पुन्हा घट होऊन पारा 13.9 अंशांपर्यंत खाली आला. अवघ्या तीन दिवसांत शहराच्या किमान तापमानात 0.9 अंशांची घट झाली आहे.

निफाडमध्ये थंडीचा जोर कायम
निफाड परिसरातही थंडीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. 10 नोव्हेंबर रोजी येथील किमान तापमान 12.5 अंश सेल्सिअस होते. 11 नोव्हेंबरला त्यात मोठी घट होऊन तापमान 10.1 अंशांवर पोहोचले. गुरुवारी मात्र तापमानात किंचित वाढ होऊन 11.3 अंशांची नोंद झाली. तरीही नाशिक जिल्ह्यात निफाड परिसरात सर्वाधिक गारठा जाणवत आहे.
https://www.prahaar.in/2026/11/13/hot-days-and-cool-nights-in-maharashtra-what-will-the-weather-be-like-over-the-next-4-to-5-days/
मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना उबदार कपड्यांचा आधार
पहाटेच्या वेळी मोकळ्या जागांमध्ये, नदीकाठच्या परिसरात आणि ग्रामीण भागात थंडी अधिक जाणवत आहे. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक, मॉर्निंग वॉकसाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना उबदार कपडे वापरावे लागत आहेत. रात्री उशिरा आणि पहाटे हवेत गारवा असला, तरी सकाळी सूर्यप्रकाश वाढल्यानंतर थंडीचा प्रभाव कमी होत आहे. ऑक्टोबर महिन्यातही उन्हाचा कडाका कायम असल्याने यंदा थंडीचे आगमन काहीसे उशिराने झाले. मात्र, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून किमान तापमानात घट होऊ लागल्याने हिवाळ्याची चाहूल लागली आहे.

किमान तापमानात घट, कमाल तापमान मात्र 33 अंशांवर
जिल्ह्यात पहाटे थंडी जाणवत असली, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम आहे. किमान तापमानात घट होत असताना कमाल तापमानात फारसा बदल झालेला नाही. गुरुवारी नाशिक शहरात कमाल तापमान 32.9 अंश सेल्सिअस, तर निफाडमध्ये 33 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यामुळे सध्या नाशिक जिल्ह्यात पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका असे संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी काळात तापमानात आणखी काय बदल होतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language