Hashtagintro

Ramayana Box Office Collection: रामायणचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! आठ दिवसांत 1,000 कोटींचा टप्पा पार; 'पठाण' आणि 'अ‍ॅनिमल'लाही टाकलं मागे

Ramayana Box Office Collection Day 8: रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि रवि दुबे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असलेल्या या चित्रपटाने अवघ्या आठ दिवसांत जगभरात 1,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, इतक्या कमी दिवसांत हा टप्पा गाठणारा ‘रामायण’ हा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.

भारतामधील कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने मोठी कामगिरी केली आहे. रणबीर कपूरच्याच ‘अ‍ॅनिमल’ आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटांचे कमाईचे विक्रम ‘रामायण’ने मागे टाकले आहेत.

आठ दिवसांत किती झाली ‘रामायण’ची कमाई?

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सर्व भाषांमध्ये 53.50 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील चित्रपटाची एकूण कमाई 564.60 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर भारतातील एकूण ग्रॉस कमाई 675.05 कोटी रुपये झाली आहे.

परदेशातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परदेशातून आतापर्यंत 358.50 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. त्यामुळे भारत आणि परदेशातील कमाई मिळून चित्रपटाचे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन 1,033.55 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

‘पठाण’ आणि ‘अ‍ॅनिमल’चे विक्रम मोडले

‘रामायण’ने भारतात 560 कोटी रुपयांचा टप्पा पार करताच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘पठाण’ने भारतात 544.28 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली होती.

विशेष म्हणजे, रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा कमाईचा आकडा 556.36 कोटी रुपये होता. ‘रामायण’ने अवघ्या आठ दिवसांत हा आकडाही पार केला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील हा आणखी एक मोठा बॉक्स ऑफिस विक्रम ठरला आहे.

जगभरात 1,000 कोटी कमावणारा तिसरा भारतीय चित्रपट

जगभरात 1,000 कोटी रुपयांची कमाई करण्यातही ‘रामायण’ने मोठी कामगिरी केली आहे. अवघ्या आठ दिवसांत हा टप्पा गाठून भारतीय चित्रपटांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.

याआधी ‘पुष्पा 2: द रूल’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटांनी केवळ सात दिवसांत जगभरात 1,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता.

इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘रामायण’नेही वेगवान कमाई केली आहे. ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ला 1,000 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी 10 दिवस लागले होते. तर ‘आरआरआर’ने 16 दिवसांत आणि ‘जवान’ने 18 दिवसांत हा आकडा पार केला होता.

‘रामायण’चा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार?

दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी ‘रामायण’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत दिसत आहे. साई पल्लवीने माता सीतेची, रवि दुबेने लक्ष्मणाची, तर यशने रावणाची भूमिका साकारली आहे. नमित मल्होत्रा आणि यश यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.

चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘रामायण’चा दुसरा भाग दिवाळी 2027 किंवा 2028 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language