Hashtagintro

Ratnagiri News : गुहागर पंचायत समितीत कर्मचाऱ्यांना मोबाईल बंदी!

गुहागर शहर : जनतेची कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांसमोर कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र यापुढे दिसता कामा नये. कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापर टाळून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कामकाज करावे, अशा स्पष्ट सूचना गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती नीलेश सुर्वे यांनी मासिक सभेत केल्‍या. पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजात शिस्त व सुसूत्रता आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. सभापती प्रणव पोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

तालुक्यातील नागरिक विविध समस्या घेऊन लोकप्रतिनिधींकडे येतात. त्यामुळे प्रशासकीय परिपत्रके व शासनाच्या निर्णयांमधील बदलांची माहिती लोकप्रतिनिधींना असणे आवश्यक आहे. मात्र पंचायत समितीतील प्रशासकीय कामकाज व अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील चर्चेची माहिती बाहेर कशी जाते, यावर सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. अशाप्रकारचे वर्तन यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. या सभेला महावितरण व दूरसंचार विभागाचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने या विभागांशी संबंधित प्रश्नांचा निपटारा होऊ शकला नाही.

ग्रामपंचायतींकडील १५ व्या वित्त आयोगाच्या खर्च व शिल्लक निधीची सविस्तर माहिती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्यवहारासाठी शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची खाती आयसीआयसीआय बँकेच्या खरवते शाखेत उघडण्यात आली आहेत. या शाखेकडून ग्रामपंचायतींना आवश्यक सहकार्य मिळत नसल्याची तक्रार सभेत करण्यात आली. दर आठवड्याला बँकेचा एक कर्मचारी पंचायत समितीत उपलब्ध राहून ग्रामपंचायतींच्या अडचणी सोडवेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याची पूर्तता होत नसल्याने खरवते शाखेतील सर्व खाती बंद करून सहकार्य करणाऱ्या अन्य बँक शाखेत उघडण्याचा ठराव घेण्यात आला.

मनरेगा कामांचा आढावा घेताना नेटवर्क नसलेल्या भागातील कामांचे मॅपिंग कसे करायचे, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्ण झालेल्या कामांची मस्टर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पंचायत समितीतील प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक खातेबदल करणे, कर्मचाऱ्यांसाठी जागा निश्चित करणे, कामचुकार कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्या बदलीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याचा निर्धारही सभेत करण्यात आला. यावेळी उपसभापती नीलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language