Hashtagintro

Ratnagiri News| नारायण शेणवींचा वाडा झाडी-झुडपांत हरवला!

राजापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजापूरच्या इतिहासाशी तसेच इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित महत्त्वाची व्यक्ती म्हणून उल्लेख असलेल्या नारायण शेणवी यांच्या वाड्याची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. राजापूर नगर वाचनालयासमोरील भटाळी परिसरात असलेल्या या ऐतिहासिक वास्तूभोवती मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढली असून वाड्याचे बांधकामही जीर्ण झाले आहे. मात्र, या वास्तूचे पारंपरिक दगडी बांधकाम आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे.

राजापूर येथील पत्रकार तसेच मंदिर व इतिहास अभ्यासक विनोद पवार यांनी या वाड्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी वाड्याची सध्याची अवस्था, दगडी बांधकामाचे अवशेष तसेच वास्तूभोवती वाढलेली झाडी-झुडपे याची पाहणी करण्यात आली. राजापूरच्या शिवकालीन इतिहासाशी संबंधित या वास्तूचे तातडीने दस्तऐवजीकरण व संवर्धन होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सतराव्या शतकात राजापूर हे दक्षिण कोकणातील महत्त्वाचे व्यापारी बंदर होते. येथे इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीची वखार होती. राजापूरच्या इंग्रज वखारीच्या नुकसान भरपाईवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नारायण शेणवी यांनी इंग्रजांचे दुभाषे, प्रतिनिधी आणि मध्यस्थ म्हणून भूमिका बजावल्याचे ऐतिहासिक कागदपत्रांतून दिसून येते.

राजापूरच्या वखारीशी संबंधित नुकसान भरपाईच्या प्रश्नावर नारायण शेणवींनी मराठा दरबाराशी संपर्क साधला होता. पुढे १६७४ मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या पूर्वतयारीच्या काळात ते रायगडावर गेले होते. ४ एप्रिल १६७४ रोजी रायगडावरून त्यांनी मुंबईतील इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहिल्याचा ऐतिहासिक संदर्भ आढळतो. या पत्रातून त्या काळातील राजकीय वातावरण, राज्याभिषेकाची तयारी तसेच तत्कालीन घडामोडींची माहिती मिळते. त्यामुळे राजापूरच्या इंग्रज वखारीपासून रायगडावरील मराठा दरबारापर्यंत इंग्रज आणि मराठा सत्तेमधील संवादात भूमिका बजावणाऱ्या नारायण शेणवी यांच्या नावाशी जोडली जाणारी ही वास्तू राजापूरच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. प्रसिद्ध नाटककार व दिग्दर्शक राजेश देशपांडे हे नारायण शेणवी यांचे थेट वंशज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या वाड्याकडे केवळ जुनी किंवा जीर्ण वास्तू म्हणून न पाहता राजापूरच्या ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा भौतिक दुवा म्हणून पाहण्याची गरज आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language