Hashtagintro

Sangli News : दुष्काळाने रोजगार हिरावला; पोटासाठी मजुरांची ऊसतोडीकडे धाव!

दिघंची : दुष्काळामुळे आटपाडी तालुक्यात शेतीची कामे ठप्प झाली असून, शेतमजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. उदरनिर्वाहासाठी शेकडो मजुरांनी ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यांची वाट धरली आहे. महिला, मुले आणि जनावरांसह बिऱ्हाडे गावाबाहेर पडू लागल्याने अनेक गावांमध्ये शुकशुकाट जाणवत आहे. दुसरीकडे, शेतीच्या कामांसाठी स्थानिक शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुष्काळामुळे रोजगाराचा अभाव आणि मजुरांची टंचाई, अशा दुहेरी संकटाचा सामना तालुक्याला करावा लागत आहे.

प्रत्येक मुकादमाकडे साधारणतः १० ते १५ कामगारांचा गट असतो. ऊस तोडणीच्या हंगामात पाच ते सहा महिने काम मिळत असल्याने मजूर या कामाला प्राधान्य देतात. या कालावधीत खर्च वजा जाता एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जाते.

स्थानिक शेतकऱ्यांसमोरही मोठी अडचण

आटपाडी तालुक्यातील मजूर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील विविध भागांत ऊसतोडणीसाठी जात आहेत. त्याचवेळी तालुक्यातील ऊसशेतीत काम करण्यासाठी बाहेरील जिल्ह्यांतूनही मजूर दाखल झाले आहेत. त्यांच्या निवासासाठी राहुट्या उभारण्याचे काम सुरू आहे. दुष्काळामुळे शेतीतील कामे कमी झाली असली, तरी उपलब्ध पाण्यावर पिके जगवण्यासाठी काही शेतकऱ्यांना मजुरांची गरज आहे. मात्र, मोठ्या संख्येने मजूर बाहेरगावी गेल्याने स्थानिक पातळीवर मजूर मिळणे अवघड झाले आहे. परिणामी, मजूर आणि शेतकरी या दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुलांच्या शिक्षणावर परिणाम

ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या अनेक मजुरांची मुले शाळेत शिकत आहेत. आई-वडिलांसोबत त्यांनाही उसाच्या फडात जावे लागल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाची विशेष व्यवस्था करण्याची गरज आहे. तालुक्यात लघुउद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग आणि रोजगारनिर्मिती करणारे व्यवसाय वाढल्यास मजुरांना गावातच काम मिळू शकते. दुष्काळी भागात स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवून स्थलांतर कमी करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language