Hashtagintro

Satara Fraud Case : साताऱ्यात वृद्धाला २८ लाखांचा गंडा

सातारा : ‘तुमचा १ हजार ७०० कोटींच्या बँक घोटाळ्याशी संबंध आहे… तुमच्या खात्यात ४० कोटी रुपये जमा झाले आहेत…’ अशा धक्कादायक दाव्यांनी ७१ वर्षीय वृद्धाला भीतीच्या जाळ्यात ओढत सायबर भामट्यांनी सुमारे २८ लाख रुपयांना गंडा घातला. मुंबईतील अँटी करप्शन ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून व्हॉटस्‌ॲप कॉल आणि व्हिडीओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्टचा बनाव केला.

रिझर्व्ह बँकेच्या पडताळणीचे कारण सांगत वृद्धाकडून विविध बँक खात्यांवर पैसे जमा करून घेतले. १५ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत हा प्रकार घडला. विठ्ठल दिनकर फडतरे (रा. जिहे, ता. सातारा) यांनी याबाबत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवली. अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी व्हॉटस्‌ॲप आणि व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. आपण मुंबईतील अँटी करप्शनचे वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करीत संदीप कुमार याच्या कथित १ हजार ७०० कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याची माहिती दिली. यामध्ये १७० जण सहभागी असून, त्यातील ४० कोटी रुपये फडतरे यांना मिळाल्याचा बनाव आरोपींनी केला.

या घोटाळ्याशी नाव जोडल्याने फडतरे यांच्यावर कारवाई होऊ शकते, अशी भीती निर्माण केली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेमार्फत त्यांच्या पैशांची पडताळणी करायची असल्याचे सांगितले. यासाठी विविध बँक खात्यांवर पैसे जमा करण्याच्या सूचना दिल्या. भीतीपोटी फडतरे यांनी आरोपींच्या सांगण्यावरून पैसे पाठवले. अशाप्रकारे सायबर भामट्यांनी त्यांची २८ लाख रुपयांची फसवणूक केली. सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना व्हिडीओ कॉलवरून धमकावणे आणि पैशांची पडताळणी करण्याच्या नावाखाली रक्कम उकळणे, अशाप्रकारे डिजिटल अरेस्टचा बनाव केला जातो. या घटनेमुळे सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठांना लक्ष्य केले जात आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language