Hashtagintro

Sayaji Shinde: 2029 निवडणुकीसंदर्भात सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य; या अहंकारी लोकप्रतिनिधींना..

Sayaji Shinde: 2029 निवडणुकीसंदर्भात सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य; या अहंकारी लोकप्रतिनिधींना..

Sayaji Shinde: सातारा जिल्ह्यातील तारळे इथल्या अदानी प्रकल्पावरून अभिनेता आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत त्यांनी पाहणी केली. प्रकल्पासाठी अनधिकृतपणे वृक्षतोड करण्यात आल्याचा तसंच कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून त्यांनी सरकार आणि लोकप्रतिनिधींनाही धारेवर धरलं. एवढंच नाही, तर पर्यावरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अहंकारी लोकप्रतिनिधींना 2029 च्या निवडणुकीत धडा शिकवणार, असा थेट इशाराही सयाजी शिंदे यांनी दिला आहे.

अदानी प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्ह

तारळी प्रकल्पाबाबत बोलताना सयाजी शिंदे यांनी आर्थिक व्यवहारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, या प्रकल्पासाठी अदानींकडून 5 हजार 675 कोटी रुपयांचा आकडा दाखवण्यात आला. मात्र, त्यानंतर 500 रुपयांच्या बाँडवर हा प्रकल्प 56.75 कोटी रुपयांचाच असल्याचं लिहून देण्याची तयारी दाखवण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्षात कमी रक्कम भरली जाईल, असा प्रस्ताव देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण व्यवहाराला सरकार, वनविभाग आणि मुख्यमंत्र्यांनी डोळेझाक करून मंजुरी दिली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाविरोधात तक्रार केली पाहिजे की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.

परवानगी नसताना प्रकल्प पूर्ण कसा झाला?

या प्रकल्पाच्या परवानग्यांवरही सयाजी शिंदे यांनी आक्षेप घेतला. नॅशनल बोर्ड फॉर वाइल्डलाइफची (NBWL) परवानगी मिळाल्याशिवाय प्रकल्प सुरू करता येत नाही, असं त्यांनी म्हटलं. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता प्रकल्प पूर्ण झाल्याचं दिसून आलं. अद्याप आवश्यक परवानगी मिळालेली नसताना प्रकल्प पूर्ण कसा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पर्यावरणमंत्र्यांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. संबंधित लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सयाजी शिंदे यांनी केवळ आर्थिक व्यवहार आणि परवानग्यांवरच नव्हे, तर पर्यावरणाच्या मूल्यमापनाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. पर्यावरण, झाडं, पक्षी आणि प्राण्यांची किंमत तुमच्या लेखी काय आहे? असा सवाल त्यांनी सरकारला केला. 15 इंचांचं झाड असेल तरच त्याला झाड म्हणायचं का? वेली आणि गवताला झाड मानायचं नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गवतावरच आपण जगतो. मात्र, गवताची किंमत मोजण्याबाबतही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. गवताला ही मंडळी 33 कोटींमध्ये मोजतात, असं ते म्हणाले.

2029 च्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्वप्रथम कायद्यांमध्ये बदल होण्याची गरज असल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. विकासाच्या नावाखाली निसर्गाचं नुकसान होता कामा नये. पर्यावरणाला योग्य महत्त्व मिळालं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. पर्यावरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अहंकारी लोकप्रतिनिधींना 2029 च्या निवडणुकीत धडा शिकवणार, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे तारळे अदानी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language