
‘संतोष’ फेम अभिनेत्री शहाना गोस्वामीनं नुकतीच एका मुलाखतीत लग्नाऐवजी अनेक जोडीदार ठेवण्याबद्दल आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. तिनं नात्यांमध्ये महिलांच्या लैंगिकतेचं आणि स्वातंत्र्याचं समर्थन केले. यामुळे सोशल मीडियावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि शहानाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. आता, ‘कहानी घर घर की’ फेम अभिनेत्री श्वेता केसवानीनं शहानाला पाठिंबा दिला आहे. तिनं वैयक्तिक नातेसंबंध आणि प्रेमावरून लोकांना ट्रोल करणाऱ्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. श्वेतानं स्पष्टपणे सांगितलं की, आपल्या समाजात पुरुष आणि महिलांच्या लैंगिकतेबाबत दुटप्पीपणा आहे.
काय म्हणाली श्वेता केसवानी?
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत श्वेता म्हणाली की, अनेक जोडीदारांसोबतचे नातेसंबंध सांभाळणं सोपे नाही, पण जर शहाना तिच्या आयुष्यात आनंदी असेल, तर लोकांनी तिचा आदर केला पाहिजे. श्वेता असंही म्हणाली की, समाज अनेकदा पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधांवर गप्प राहतो, तर ज्या महिला आपल्या लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलतात त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं.
श्वेता केसवानीने शहानाचं कौतुक करत म्हटलं की, ती ज्या प्रकारे आपले रिलेशनशिप सांभाळते, तो तिचा वैयक्तिक निर्णय आहे. श्वेता म्हणाली, ‘मला वाटतं ती अप्रतिम आहे. जर ती इतक्या लोकांसोबतचे रिलेशनशिप सांभाळू शकत असेल, तर ही तिच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कल्पना करा, जर एखाद्याचे पाच जोडीदार असतील! जर त्यांना त्यात आनंद मिळत असेल आणि त्यांना ते पुढे चालू ठेवायचं असेल, तर त्यांच्यात अधिक धैर्य असायला हवं.’
श्वेतानं असाही प्रश्न विचारला की, लोकांना शहानाच्या वैयक्तिक आयुष्यात इतका रस का आहे? दुसऱ्यांच्या रिलेशनशिपवर टिप्पणी करण्याऐवजी लोकांनी स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. श्वेता म्हणाली, ‘हे असे कोण लोक आहेत जे दुसऱ्यांच्या आयुष्यात इतका रस घेतात? तुम्ही स्वतःसाठी काही करू शकत नाही का? स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा.’
महिलांच्या लैंगिकतेबाबत समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्वेता केसवानी म्हणाली की, पुरुष आणि महिला यांच्यातील संबंधांबद्दल समाजाची वृत्ती वेगवेगळी असते. श्वेता म्हणाली की, ‘जेव्हा एखादा पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवतो, तेव्हा कोणी काही बोलत नाही. पण जर एखादी स्त्री लैंगिकदृष्ट्या सक्रिय असेल आणि तिला स्वतःच्या अटींवर जगायचं असेल, तर लोक लगेच तिच्यावर टीका-टिप्पणी आणि शिवीगाळ करायला लागतात. ही एक दुटप्पी भूमिका आहे.’
श्वेता म्हणाली की, एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत परस्पर संमतीनं संबंध ठेवणं ही काही नवीन गोष्ट नाही. ‘ओपन मॅरेज‘बद्दल श्वेता म्हणाली की, ‘ओपन मॅरेज अस्तित्वात आहेत. यात एवढं मोठं काय आहे हे मला समजत नाही.’
श्वेता पुढे म्हणाली की, कोणत्याही नात्यात सामील असलेल्या लोकांची संमती आणि आनंद सर्वात महत्त्वाचा आहे. ‘जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार यासाठी तयार असाल, तर तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या अटींवर का जगावं? ती स्वतःसाठी जगत आहे, इतरांसाठी नाही.’
दरम्यान, शहाना गोस्वामी म्हणालेली की, ती एकाच वेळी पाच मुलांना डेट करतेय. अभिनेत्रीच्या या वक्तव्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलेलं.
Source: TV9 Marathi National
