
भारत आणि पाकिस्तान मध्ये अंडर 19 आशिया कपची फायनल सुरु आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी फलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवला आहे. भारताकडे आजच्या सामन्यात बदला घेण्याची संधी आहे. अमरात स्टेडियममध्ये ही मॅच सुरु आहे. सलग दुसऱ्यांदा दोन्ही टीम्स आमने-सामने आहेत. टीम इंडियाकडे साखळी सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. ग्रुप स्टेजमध्ये रोमांचक सामन्यात पाकिस्तानने भारताचा 3 विकेटने पराभव केला होता. त्यामुळे आजच्या फायनलमध्ये भारताकडे मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांना पाकिस्तानी फलंदाजांना रोखण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
30 ओव्हर्समध्ये पाकिस्तानने दोन विकेट गमावून 200 धावांचा टप्पा पार केला आहे. पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीने 62 धावांची भागीदारी केली आहे. हयान खान (21) आणि अब्दुल कादीर (80) हे दोन फलंदाज पॅवेलियनमध्ये परतले आहेत. यात अब्दुल कादीरची विकेट महत्वाची होती. त्याने 54 चेंडूत 80 धावा केल्या. त्याने तीन फोर आणि 8 सिक्स मारले. विनीतने त्याला अर्जुन राजपूत करवी कॅचआऊट करुन भारताला महत्वपूर्ण यश मिळवून दिलं. ओपनर उस्मान खान अजूनही विकेटवर असून तो नव्वदीत पोहोचला आहे. त्याने 10 फोर आणि दोन षटकार लगावले.
टीम इंडियाने कोणत्या संघांना हरवून फायनलचं तिकिट मिळवलं?
भारत आणि पाकिस्तानच्या टीममध्ये आतापर्यंत 31 यूथ वनडे सामने झाले आहेत. त्यात भारताने 17 सामने जिंकलेत तर पाकिस्तानी टीम 13 वेळा यशस्वी ठरली आहे. एका सामना टाय झाला होता. मागच्या सामन्यात टीम इंडियाने 208 धावा केल्या होत्या. पाकिस्तानने सात विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. या पराभवामुळे भारताच्या फायनल गाठण्याच्या अपेक्षांमा मोठा धक्का बसला होता. पण टीम इंडियाने त्यानंतर यूएई, नेपाळ आणि अफगाणिस्तान या टीम्सवर विजय मिळवून फायनलचं तिकिट मिळवलं. आज फायनलमध्ये टीम इंडियाकडे मागच्या सगळ्या पराभवांचा बदला घेण्याची संधी आहे. मागच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारताकडून अर्जुन राजपूतने सर्वाधिक 107 धावा केल्या होत्या. काव्य पटेलने 23 तर आर्यवीर सेहवागने 22 धावांचे योगदान दिले.
Source: TV9 Marathi Sports
