Hashtagintro

US-Iran Conflict : इराणचे कुवेत-बहरीनवर हल्ले, अमेरिकेच्या कारवाईला प्रत्युत्तर

दुबई : अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीतील केशम बेटावर केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर रात्रीतून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले चढवले. सप्टेंबरनंतरचा इराणचा कुवेतवरील हा पहिलाच मोठा हल्ला आहे. दुसरीकडे, बहरीननेही बुधवारी (दि. १८) इराणचे हवाई हल्ले परतवून लावले. या वाढत्या तणावामुळे शांततेचे सर्व मुत्सद्दी प्रयत्न धोक्यात आले आहेत.

अमेरिकन लढाऊ विमानांनी केशम बेटावरील क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळावर मंगळवारी (दि. १७) सायंकाळी हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर देताना इराणच्या लष्कराने कुवेतमधील ‘अली अल-सालेम’ हवाईतळावरील अमेरिकन ड्रोन आणि क्षेपणास्त्र यंत्रणांना लक्ष्य केले. आपले सार्वभौमत्व आणि महत्त्वाच्या आस्थापनांचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचा अधिकार असल्याचे कुवेतने म्हटले आहे. दरम्यान, शत्रूने पुन्हा चूक केल्यास आम्ही कोणत्याही भौगोलिक मर्यादेशिवाय अधिक विनाशकारी प्रत्युत्तर देऊ, असा थेट इशारा इराणचे लष्करप्रमुख अमीर हातमी यांनी दिला आहे.

सागरी वाहतूक आणि जागतिक इंधन दरांवर परिणाम

फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यापासून हा संघर्ष लेबनॉन आणि येमेनपर्यंत पसरला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढत्या हल्ल्यांमुळे जागतिक तेल आणि वायूचे दर गगनाला भिडले आहेत. मंगळवारी यूएईच्या ‘ॲडनॉक’ कंपनीच्या जहाजावर झालेल्या हल्ल्यात ११ कर्मचारी जखमी झाले असून, एकजण बेपत्ता आहे. तसेच, सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने रियाधच्या दिशेने येणारे हुतींचे क्रूझ क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. दुसरीकडे, कतारने इराणसोबत चर्चा करून तणाव निवळण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

वॉशिंग्टनवरील हल्ल्याची शक्यता फेटाळली

इराण अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनवर किरणोत्सर्गी ‘डर्टी बॉम्ब’ हल्ला करण्याचा कट रचत असल्याच्या वृत्ताची अमेरिकेने गंभीर दखल घेतली असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. मात्र, वॉशिंग्टनवर असा कोणताही तत्काळ धोका नसल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी बुधवारी स्पष्ट केले. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language