
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्यासाठीही ओळखली जाते. तिच्या नृत्याची अदाकारी आणि ऊर्जा चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते. मात्र, यावेळी अमृता कोणत्याही चित्रपटातील डान्स किंवा रिएलिटी शोमुळे चर्चेत आलेली नाही. तर तिने दिलेल्या एका परीक्षेमुळे ती चर्चेत आली आहे. अमृताने चक्क कथ्थक नृत्याची लेखी परीक्षा दिली आहे. विशेष म्हणजे, इतर विद्यार्थ्यांप्रमाणे वर्गात बाकावर बसून, हातात हॉलतिकीट आणि रोल नंबर घेऊन तिने हा पेपर सोडवला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कमेंटनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अमृताने शेअर केला परीक्षेचा खास व्हिडीओ
अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील खास क्षण, कामाचे अपडेट्स आणि वैयक्तिक अनुभव ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये ती इतर विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसून कथकची लेखी परीक्षा देताना दिसत आहे. या पोस्टला तिने खास कॅप्शनही दिलं आहे. अमृता म्हणते, ‘स्वतःचा अभिमान वाटणारा आणखी एक दिवस… कथ्थकसाठी माझी लेखी परीक्षा. हा प्रवास पूर्णपणे वैयक्तिक आणि माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. काही वर्षांपूर्वी मी स्वतःला वचन दिलं होतं की केवळ माझ्या आनंदासाठी या मार्गावर चालायचं. कोणतीही घाई नाही, कोणतीही अट नाही, फक्त एकेक पाऊल पुढे टाकत राहायचं.’
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
पुढे तिने सांगितलं की, इतर विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसून, हातात हॉलतिकीट आणि रोल नंबर घेऊन, खिडकीजवळच्या जागेवर बसून प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा अनुभव खूप छान होता. या प्रवासात साथ देणाऱ्या प्रिराशाचेही तिने आभार मानले आहेत.
प्राजक्ता माळीची कमेंट चर्चेत
अमृताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र, अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कमेंटने विशेष लक्ष वेधलं. प्राजक्ताने कमेंट करत लिहिलं, ‘Ohh MY MY… वेलकम टू द लीग, कसा गेला पेपर?’ यावर अमृतानेही मजेशीर उत्तर दिलं. ‘मस्त गेला पेपर’, असं तिने म्हटलं. दोघींच्या या संवादाला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
अभिनयासोबत कथ्थकचीही साधना
अमृताने याआधीही अनेकदा आपल्या नृत्यप्रेमाची झलक दाखवली आहे. 2023 मध्ये तिने ‘मुघल-ए-आझम’मधील ‘मोहे पनघट पे’ या गाण्यावर कथ्थक सादर केलं होतं. आता लेखी परीक्षा देण्याच्या तिच्या निर्णयामुळे ती केवळ नृत्य सादर करण्यापुरती मर्यादित नसून त्याचा अभ्यासही मनापासून करत असल्याचं दिसत आहे.
Source: TV9 Marathi Entertainment
