
बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यातील गाण्यांवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. संगीतकार ए. आर. रहमान यांनी तयार केलेल्या ‘रावण तांडव’ आणि ‘मंगल रंग’ या गाण्यांवर काही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. गाण्यांच्या संगीतशैलीवरून टीका होत असतानाच आता ए. आर. रहमान यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेपेक्षा आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
ए. आर. रहमान यांनी ट्रोलिंगवर दिली प्रतिक्रिया
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रहमान यांनी गाण्यांवरून सुरू असलेल्या चर्चेबद्दल भाष्य केलं. एखादं गाणं तयार करण्यासाठी संगीतकार आणि संपूर्ण टीमला अनेक टप्प्यांतून जावं लागतं, असं त्यांनी सांगितलं. रहमान म्हणाले की, गाण्याच्या निर्मितीदरम्यान अनेक कल्पनांवर काम केलं जातं. त्यात वेळोवेळी बदल केले जातात आणि गाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध चाचण्याही घेतल्या जातात. या संपूर्ण प्रक्रियेनंतर गाणं प्रदर्शित केलं जातं. त्यामुळे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावरील प्रत्येक प्रतिक्रिया पाहण्यासाठी फारशी एनर्जी ऊर्जा उरत नाही.
‘लोकांना बोलू द्या, मी माझं काम प्रामाणिकपणे केलंय’
पुढे बोलताना रहमान यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर गाण्यांना मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल त्यांचा मुलगा माहिती देत असतो. एखाद्या व्यक्तीने गाण्यावर टीका केली आणि नंतर आपलं मत बदललं, अशा गोष्टीही ते त्यांना सांगतात. यावर रहमान यांची भूमिका स्पष्ट आहे. “ लोकांना बोलू द्या. मी माझं काम प्रामाणिकपणे केलं आहे. मला आशा आहे की लोकांना ही गाणी आवडतील” असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे गाण्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका समोर आली आहे.
‘रावण तांडव’नंतर ‘मंगल रंग’वरूनही चर्चा
दसऱ्याच्या दिवशी ‘रामायण’ चित्रपटातील ‘रावण तांडव’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याच्या संगीतशैलीवरून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काही प्रेक्षकांनी ए. आर. रहमान यांच्या संगीतावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी त्यांच्या प्रयोगशीलतेचं समर्थन केलं. यानंतर आता ‘मंगल रंग’ या गाण्यामुळे नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात सजलेल्या या गाण्यात भगवान राम आणि माता सीता यांच्या विवाहाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे.
मात्र, काही प्रेक्षकांना या गाण्याचं संगीत कव्वालीच्या शैलीशी साधर्म्य असलेलं वाटलं. काहींनी त्याची तुलना ‘कुन फाया कुन’ या गाण्याशीही केली. ‘रामायण’सारख्या पौराणिक कथानकावर आधारित चित्रपटातील गाण्यांना पारंपरिक आणि धार्मिक वातावरणाला साजेसं संगीत असायला हवं होतं, असं मत काही प्रेक्षकांनी व्यक्त केलं. दुसरीकडे, अनेक चाहते ए. आर. रहमान यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. संगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य कलाकारांना असायला हवं, अशी भूमिका काही चाहत्यांनी मांडली आहे.
‘रामायण’साठी संगीत देणं हा मोठा सन्मान
या मुलाखतीत ए. आर. रहमान यांनी ‘रामायण’सारख्या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी संगीत तयार करण्याची संधी मिळणं हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचंही सांगितलं. या चित्रपटासाठी त्यांना प्रसिद्ध जर्मन संगीतकार हान्स झिमर यांची साथ लाभली आहे. दोघांनी मिळून चित्रपटाचं संगीत तयार केलं आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी माता सीता, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या भव्यतेमुळे आणि कलाकारांच्या निवडीमुळे या प्रोजेक्टकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष लागलं आहे.
चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे, तर दुसरा भाग पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Source: TV9 Marathi Entertainment
