Hashtagintro

मुंबईत संतापजनक प्रकार! फटाके फोडण्याच्या वादातून दाम्पत्य आणि चिमुरडीवर 10 जणांचा जीवघेणा हल्ला

मुंबई: दिवाळीच्या आनंदात मग्न असलेल्या मुंबई शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील मरोळ परिसरात फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका कुटुंबावर 8 ते 10 जणांच्या झुंडीने अमानुष हल्ला केल्याची घटना घडली आहे. या भीषण मारहाणीत पती-पत्नी आणि त्यांची लहान मुलगी असे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार जणांना अटक केली असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.

नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथील कृष्ण नगर भागात गुप्ता कुटुंबीय राहत असून त्यांची लहान मुलगी घराबाहेर मोकळ्या जागेत फटाके फोडत होती. यादरम्यान, बादल गोस्वामी नावाच्या व्यक्तीने लहान मुलीला फटाके फोडण्यास मज्जाव केला आणि तिच्याशी अरेरावी करत कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद इतक्यावरच थांबला नाही. बघता बघता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. काही वेळातच 8 ते 10 जणांचा ग्रूप तिथे जमा झाला आणि त्यांनी गुप्ता कुटुंबावर हल्ला केला.

महिला आणि चिमुरडीलाही बेदम मारहाण
या हिंसक हल्ल्यात आरोपींनी सर्व मर्यादा ओलांडल्या. हल्लेखोरांनी महिलेला धक्काबुक्की करत खाली पाडले आणि लाथा-बुक्क्यांनी तसेच लाठ्या-काठ्यांनी तिला बेदम मारहाण केली. आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या पतीवरही या टोळीने प्राणघातक हल्ला केला. एवढेच नव्हे तर, या वादात मध्ये पडलेल्या त्यांच्या लहान मुलीलाही सोडले नाही, तिलाही मारहाण करण्यात आली. या अमानुष मारहाणीत संपूर्ण कुटुंब गंभीर जखमी झाले आहे. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी कुटुंबाला उपचारासाठी तात्काळ जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे मरोळ परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तत्परता दाखवत तात्काळ गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारांसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत, तर उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. दिवाळीसारख्या सणाच्या दिवशीच मुंबईत घडलेल्या या हाणामारीच्या घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language