मुंबई : काही नाती मैत्रीच्या चौकटीत सहज सामावतात, तर काही नकळत त्या चौकटीपलीकडे जातात. अशावेळी त्या नात्याला मैत्री म्हणावं की प्रेम, असा प्रश्न निर्माण होतो. मैत्री आणि प्रेमाच्या याच सीमारेषेवर उभ्या असलेल्या नात्यांची भावनिक कहाणी घेऊन ‘मैत्रेया’ हा मराठी चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
2 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तर आज 19 नोव्हेंबर रोजी राजकीय नेत्यांच्या हजेरीमुळे आणि कलाकारांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाचा प्रीमियर सोहळा रंगतदार झाला. यावेळी समर, आयुषी, स्काय, रूची यांच्यासह चित्रपटाच्या लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे आणि समीर वानखेडे उपस्थित होते.
चित्रपटाच्या ट्रेलरमधून जय, साजिरी, आर्जोयी आणि निर्वाण यांच्या आयुष्यातील नाती, त्यांच्यातील जवळीक आणि एकमेकांबद्दल बदलणाऱ्या भावना उलगडताना दिसतात. जय आणि आर्जोयी यांची घट्ट मैत्री, जय आणि साजिरी यांच्यातील जवळीक, तर आर्जोयी आणि निर्वाण यांचं नातं अशा वेगवेगळ्या भावविश्वातून ही कथा पुढे सरकते. मैत्रीतून निर्माण होणारी प्रेमाची चाहूल, प्रेमातील संभ्रम आणि नात्यांमधील भावनिक गुंता यांचं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/18/maharashtrachi-hasyajatra-fame-rasika-vengurlekars-dream-of-owning-a-home-comes-true-housewarming-ceremony-held-for-her-new-home/
कधी मैत्रीच्या नात्यात प्रेमाची चाहूल लागते, तर कधी प्रेमाच्या भावनांना मैत्रीचा आधार मिळतो. या चौघांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं? मैत्री आणि प्रेमाच्या या गुंत्यात कोणती नाती पूर्णत्वाला जातात आणि कोणती अपूर्ण राहतात? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातून मिळणार आहेत. विशेष म्हणजे, ‘मैत्रेया’मधील गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत असून, प्रत्येक गाण्यातून नात्यांमधील भावना आणि आनंदाचे विविध रंग अनुभवायला मिळत आहेत.
चित्रपटाविषयी बोलताना लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणाल्या, “चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद खूप छान आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी केलेलं भरभरून कौतुक पाहून मी भारावून गेले आहे. आपण जवळपास वर्षभर एखाद्या सिनेमासोबत जगत असतो. आपण बनवलेली फिल्म सर्वप्रथम आपल्या घरच्या मंडळींना आवडावी, अशी मनात धाकधूक असते. अशावेळी जेव्हा आपल्या कामाची पावती मिळते, तेव्हा खूप आनंद होतो.”
https://youtube.com/shorts/AWK1GCY5E8s?si=OHLAoF_2KFyeWEGG
चित्रपटाच्या संकल्पनेविषयी त्या पुढे म्हणाल्या, “तरुण पिढीला आवडेल, त्याचबरोबर मध्यमवर्गीय मराठी कुटुंब आणि मराठी संस्कृतीशी नातं सांगणारी फिल्म बनवण्याची माझी इच्छा होती. आपल्या संस्कृतीशी जोडलेले सण-समारंभही प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळतील. अशा पार्श्वभूमीवर मला एक प्रेमकथा मांडायची होती.”
‘मैत्रेया’मधील गाणी ही केवळ मनोरंजनाचा भाग नसून, चित्रपटातील पात्रांच्या भावना आणि त्यांच्या नात्यांचा प्रवास उलगडणारा महत्त्वाचा दुवा आहेत. प्रत्येक गाण्यातून मैत्री, प्रेम, आनंद आणि भावनांचे वेगवेगळे पैलू मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे नात्यांच्या या अनोख्या प्रवासाची उत्सुकता आता वाढली असून, ‘मैत्रेया’ 20 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Source: Prahaar News
