Hashtagintro

Toilet Repair Campaign : गावोगावी शौचालयांची होणार पोलखोल, नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सरसावली; १० डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : गावोगावी स्वच्छतेचा गाजावाजा होत असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शौचालयांची दुरवस्था असल्याचे वास्तव समोर आले आहे. कुठे शौचालयांना दरवाजे नाहीत, कुठे पाण्याची व्यवस्था नाही, तर कुठे बांधकाम होऊनही शौचालये वापराविना पडून आहेत. शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयांचीही अवस्था समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील गावागावांत शौचालयांची प्रत्यक्ष तपासणी करून नादुरुस्त शौचालयांचा कायापालट करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत ‘स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/will-not-remain-silent-if-allegations-are-leveled-against-the-chief-minister-dr-vikhe-patil-responds-to-rohit-pawars-accusations-raises-three-questions/
संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या जागतिक शौचालय दिनानिमित्त जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने हे अभियान जाहीर केले आहे. ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ ही यंदाची संकल्पना असून, शौचालय ही केवळ बांधकामाची किंवा सरकारी योजनेची बाब नसून, ती मानवी प्रतिष्ठा, आरोग्य, महिलांची सुरक्षितता आणि सामाजिक समानतेशी निगडित असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी अभियानाची माहिती देताना जिल्ह्यातील प्रत्येक शौचालय वापरण्यायोग्य करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले आहे.
अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली असली, तरी त्यांचा प्रत्यक्ष वापर होत नसल्याचे चित्र आहे. काही शौचालये पाण्याअभावी बंद आहेत, तर काहींचे दरवाजे, छत किंवा इतर आवश्यक सुविधा नादुरुस्त झाल्या आहेत. महिलांना आणि दिव्यांग व्यक्तींना वापरण्यासाठी आवश्यक सुरक्षितताही अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालयांमधील शौचालयांची स्थितीही तपासली जाणार आहे. केवळ शौचालये बांधून स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, तर ती नियमित वापरात राहतील आणि त्यांची देखभाल होईल, यावर प्रशासनाचा भर असणार आहे.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम पाणी व स्वच्छता समितीची विशेष बैठक घेऊन मोहिमेचा प्रारंभ केला जाणार आहे. या मोहिमेत सामुदायिक शौचालय संकुले तसेच शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालयांतील संस्थात्मक शौचालयांची दोन टप्प्यांत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत आढळणाऱ्या त्रुटी दूर करून नादुरुस्त शौचालयांची तातडीने दुरुस्ती, स्वच्छता आणि रंगरंगोटी केली जाणार आहे. शौचालयांमध्ये पाणी, दरवाजे आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याचीही खातरजमा केली जाणार आहे. अभियानातील प्रत्येक कामाची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ तसेच दुरुस्ती केलेल्या शौचालयांचा तपशील दररोज पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कागदोपत्री स्वच्छतेचा अहवाल देण्याऐवजी प्रत्यक्ष कामाचा लेखाजोखा प्रशासनाला ठेवावा लागणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात एकही शौचालय नादुरुस्त राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. विशेषतः महिलांची सुरक्षितता, मुलींचे शिक्षण आणि दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानजनक वापराचा विचार करून शौचालये सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर राहणार आहे. दरम्यान, नागरिकांनीही केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता आपल्या घरातील शौचालय स्वच्छ, सुगंधी आणि वापरण्यायोग्य ठेवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले आहे.
या अभियानाला लोकसहभागाची जोड देण्यासाठी स्वच्छ आणि सुंदर शौचालयांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील दोन उत्कृष्ट, स्वच्छ आणि सुंदर सजवलेली वैयक्तिक शौचालये निवडून त्यांची नावे पंचायत समितीकडे पाठवायची आहेत. पंचायत समिती स्तरावरून तीन उत्कृष्ट शौचालयांची निवड करून त्यांची माहिती जिल्हास्तरावर पाठविली जाणार आहे. त्यानंतर १० डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट शौचालये जपणाऱ्या कुटुंबांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या शिवाय उत्कृष्ट सार्वजनिक शौचालयांचाही गौरव केला जाणार आहे.
आता या अभियानाचे खरे यश केवळ बैठका, पाहण्या, छायाचित्रे आणि पोर्टलवरील नोंदींमध्ये न मोजता गावागावांत प्रत्यक्ष शौचालये स्वच्छ, सुरक्षित आणि वापरण्यायोग्य झाली की नाही, यावर ठरणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायती आणि संबंधित यंत्रणा ही मोहीम किती गांभीर्याने राबवतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language