Hashtagintro

Dr. Vikhe Patil : मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्यास गप्प बसणार नाही, रोहित पवारांच्या आरोपांना डॉ. विखे पाटील यांचे प्रत्युत्तर; तीन सवाल केले उपस्थित

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अपघाताच्या तपासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यामागचे कारण काय? कुटुंबीयांनीच प्रश्न उपस्थित केलेले नसताना रोहित पवार एवढे पुढे का? आणि सीबीआयवर अचानक विश्वास कसा निर्माण झाला? असे एकापाठोपाठ तीन सवाल उपस्थित करत विखे पाटील यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
https://www.prahaar.in/2026/11/19/brihanmumbai-municipal-corporation-takes-action-against-mumbai-based-don-dawood-ibrahims-house-heavy-police-deployment-during-the-operation/

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. विखे यांनी रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर दिले. अजित पवार यांच्या निधनाचे राजकारण होऊ नये, ही आमची भूमिका होती. अजितदादा हे आमचे नेते होते आणि त्यांच्याबद्दल आम्हाला मनापासून आदर आहे. मात्र, या संवेदनशील प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव विनाकारण गोवण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला उत्तर देणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर तीन महत्त्वाचे सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, अजित पवार यांच्या अपघाताबाबत किंवा घातपाताच्या संशयाबाबत सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबीयांनी भूमिका मांडणे अपेक्षित आहे. शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी या प्रकरणात प्रश्न उपस्थित केले, तर त्यावर चर्चा होऊ शकते. मात्र, कुटुंबीयांनीच प्रश्न उपस्थित केलेले नसताना रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याचे कारण काय? दुसरा सवाल उपस्थित करताना विखे म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी ईडीच्या कारवाईच्या वेळी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांवर अविश्वास व्यक्त केला जात होता. मग आता सीआयडीऐवजी सीबीआय तपासाची मागणी का केली जात आहे? सीबीआयवर अचानक विश्वास कसा निर्माण झाला? तपास यंत्रणांबाबतची भूमिका बदलण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल त्यांनी केला.

तिसऱ्या सवालात त्यांनी व्हीएसआर कंपनीचा मुद्दा उपस्थित केला. व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबत मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र दाखवून संबंध असल्याचे सूचित केले जात असेल, तर रोहित पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे छायाचित्र दाखवून त्यांच्याबाबतही असेच प्रश्न उपस्थित करता येतील का? जर केवळ फोटोंचा आधार लावायचा असेल, तर ज्या पंतप्रधानांसोबत तुमचे फोटो आहेत आणि ज्या अदानींवर राहुल गांधी सातत्याने आरोप करतात त्यांची गाडी चालवताना तुम्ही दिसता; त्याचे उत्तर तुम्ही देणार का? असे अनेक फोटो आम्हीही दाखवू शकतो, असे विखे यांनी सांगितले.

अपघाताच्या तपासाबाबत कोणतीही शंका असल्यास निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. आवश्यक पुरावे, व्हिडिओ आणि संबंधित माहिती समोर आली पाहिजे. मात्र, चौकशीच्या नावाखाली मुख्यमंत्री फडणवीस यांना विनाकारण लक्ष्य करणे योग्य नाही. यापुढे मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप झाले, तर पक्ष म्हणून आणि वैयक्तिक पातळीवरही ठाम भूमिका मांडली जाईल, असा स्पष्ट इशाराही डॉ. विखे यांनी दिला.
अपघाताशी संबंधित काही पुरावे किंवा शंका असतील, तर त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागणे आणि त्यानंतर न्यायालयात जाणे, असे पर्याय आहेत. मात्र, केवळ माध्यमांसमोर आरोप करून कोणावरही निष्कर्ष लादता येणार नाहीत. माध्यमे ही जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचे माध्यम आहेत; ती न्यायाधीश नाहीत, असेही विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language