Hashtagintro

Strait of Hormuz : ट्रम्प यांच्या युद्ध टाळण्याच्या दाव्यानंतरही अमेरिकेचा इराणच्या केशम बेटावर हल्ला; गुप्त लष्करी कारवायांची माहिती समोर

International News: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराणच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील केशम बेटावर मर्यादित लष्करी हल्ले केल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका इराणमधील काही लक्ष्यांवर गुप्तपणे छोटे हल्ले करत असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत मोठे युद्ध टाळता येऊ शकते आणि कराराची शक्यता असल्याचे संकेत दिल्यानंतर ही कारवाई झाल्याचे समोर आले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/03/suspicious-death-of-a-married-it-engineer-in-pune-husband-taken-into-custody-zambare-palace-vandalized/
केशम बेटावर स्फोट; अमेरिकेच्या हल्ल्याचा दावा
इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘IRNA’ने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील केशम बेटावर अनेक स्फोट झाल्याचे वृत्त दिले आहे. त्यानंतर ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अमेरिकेने या बेटावर मर्यादित हल्ले केल्याचे म्हटले आहे.
काही अमेरिकी अधिकाऱ्यांनी या कारवायांचे वर्णन बचावात्मक स्वरूपाच्या कारवाया असे केले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना इराणकडून धोका निर्माण होऊ नये, हा या कारवायांचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. मोठ्या प्रमाणावर पुन्हा युद्ध सुरू करण्याचा इरादा असल्याचा संदेश जाऊ नये, यासाठी या कारवाया गुप्त ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

नेतान्याहू यांचा ट्रम्प यांच्यावर दबाव?
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर इराणवर आणखी मोठी लष्करी कारवाई करण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव आणत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, ट्रम्प यांनी सार्वजनिकरीत्या इराणसोबत पुन्हा मोठे युद्ध सुरू करण्याबाबत सावध भूमिका घेतली होती.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इराणवरील संभाव्य कारवाईबाबत ट्रम्प यांनी वेगवेगळे संकेत दिले होते. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मध्यावधी निवडणुकांनंतर इराणवर हल्ला करण्याचा विचार आहे का, असे विचारले असता ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

ट्रम्प यांचा युद्ध टाळण्याचा दावा; तेलाच्या किमतीत घसरण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत मोठे युद्ध टाळता येऊ शकते, असे संकेत दिले होते. त्यांच्या मते, इराणला अमेरिकेसोबत लवकरात लवकर करार करायचा आहे. त्यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तेलाच्या किमतीत प्रति बॅरल जवळपास 10 डॉलरची घसरण झाल्याचा दावाही केला होता.
इराणसोबत संभाव्य कराराच्या चर्चेमुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींवर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या घडामोडींनंतर केशम बेटावरील हल्ल्याची माहिती समोर आल्याने अमेरिका-इराण चर्चेच्या दिशेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.

जेडी व्हान्स यांनी व्यक्त केला होता कराराचा आशावाद
हल्ल्याच्या वृत्तापूर्वी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी इराणसोबत करार होण्याबाबत आशावाद व्यक्त केला होता. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख मोहसेन रझाई यांना व्हान्स यांनी पत्र पाठवल्याचेही वृत्त आहे. या पत्राबाबत विचारले असता व्हान्स यांनी इराणसोबत अनेक सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले होते. तसेच या विषयावर काही वेळापूर्वीच ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, अमेरिकेच्या मर्यादित लष्करी कारवाया, इराणसोबत सुरू असलेल्या चर्चेचे संकेत आणि इस्रायलची भूमिका यामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती पुन्हा चर्चेत आली आहे. या घडामोडींचा परिणाम जागतिक तेल बाजार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर होण्याची शक्यता आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language