Hashtagintro

Nashik Municipal Corporation : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी स्वच्छतेचा ध्यास, 80 कर्मचारी तैनात करणार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात सांडपाणी मिसळणे, जलपर्णी आणि कचऱ्यामुळे प्रदूषण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गोदावरी स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नदीपात्रातील जलपर्णी काढणे आणि स्वच्छतेसाठी स्वतंत्रपणे ८० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, जलपर्णी हटवण्यासाठी नवीन स्क्रिमर यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची महापालिकेला नोटीस
ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभपर्वाला सुरुवात झाल्यानंतर गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न चर्चेत आला आहे. शहरातून सुमारे २१ किलोमीटर अंतरापर्यंत वाहणाऱ्या गोदावरी नदीत सांडपाणी मिसळत असल्याने तसेच नदीपात्रातील जलपर्णी आणि कचऱ्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलीकडेच महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कुंभमेळ्यातील अमृतस्नानासाठी सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यापूर्वी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांना गती दिली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/03/possibility-of-unseasonal-rain-in-the-state-meteorological-department-issues-warning-for-konkan-and-vidarbha/
गोदावरी आणि उपनद्यांसाठी ८० कर्मचारी
गोदावरी तसेच उपनद्यांच्या पात्रातील जलपर्णी काढणे, कचरा हटवणे आणि नदीपात्र स्वच्छ ठेवण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी ८० स्वच्छता कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.नदीकाठच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे स्वतंत्र पथक कार्यरत आहे. मात्र, नदीपात्रातील स्वच्छतेची जबाबदारी नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सोपवली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक कर्मचारी गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी तैनात करण्यात येतील.नदीपात्रातील पाणवेली आणि जलपर्णी काढणे, प्लास्टिक तसेच अन्य कचरा हटवणे आणि नदीपात्र स्वच्छ ठेवणे ही प्रमुख कामे या कर्मचाऱ्यांकडून केली जाणार आहेत.

सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या कामांना गती
गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने सांडपाणी व्यवस्थापनावरही लक्ष केंद्रित केले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणे आणि अस्तित्वातील केंद्रांचे सक्षमीकरण करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.याशिवाय नदीपात्रालगतच्या सांडपाणी वाहिन्यांचे स्थलांतर केले जात आहे. नदीत थेट सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

जलपर्णी हटवण्यासाठी स्क्रिमर यंत्र
गोदावरी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण व गोदावरी संवर्धन कक्षाकडून नवीन स्क्रिमर यंत्र खरेदी करण्यात येणार आहे. या यंत्राच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण व गोदावरी संवर्धन कक्षाच्या प्रमुख तथा उपायुक्त डॉ. संगिता नांदूरकर यांनी दिली. नदीपात्रात धार्मिक विधींनंतर निर्माल्य आणि प्रसादाचे साहित्य टाकले जात असल्याने कचऱ्याची समस्या वाढत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून साधू-महंत, भाविक आणि पर्यटक गोदावरीच्या काठावर दाखल होणार आहेत. त्यामुळे नदीपात्र स्वच्छ ठेवणे आणि प्रदूषण नियंत्रणात आणणे महापालिकेसमोर महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी ८० कर्मचारी, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे सक्षमीकरण आणि स्क्रिमर यंत्र खरेदी अशा उपाययोजनांवर महापालिकेने भर दिला आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language