Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल झाला आहे. राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर काही जिल्ह्यांत उष्ण आणि कोरडे हवामान कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 2 ते 3 दिवस राज्यात पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबर रोजी कोकणापासून विदर्भापर्यंत कोणत्या भागात पाऊस पडणार, जाणून घेऊया.
https://www.prahaar.in/2026/11/02/from-karachi-to-dhaka-citizens-suffer-as-massive-protests-and-unrest-erupt-in-both-nations/
कोकणात पावसाचा अंदाज; सिंधुदुर्गला यलो अलर्ट
कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जनेचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात काही भागांत कोरडे हवामान
धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मात्र, नाशिक शहरासह घाटमाथ्याच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जना होऊ शकते. पुढील दिवशीही घाटमाथ्याच्या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता
अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर घाटमाथ्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना होऊ शकते. पुढील 2 दिवस मराठवाड्यात पावसाचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
एकूणच, 3 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे आणि वादळी हवामानाच्या वेळी आवश्यक खबरदारी घ्यावी.
Source: Prahaar News
