अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील दाट लोकवस्तीच्या भागासह प्रमुख शासकीय कार्यालयांच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुक्तपणे वावरत असलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत असून, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर केला जात आहे. मात्र, तीन दिवस उलटूनही शासकीय कार्यालयांच्या परिसरात वावरणारा बिबट्या अद्याप वनविभागाच्या हाती लागलेला नाही. ( Leopard News)
दरम्यान, शहरालगतच्या शेंडी, पोखर्डी आणि पिंपळगाव उज्जैनी परिसरात वावरणाऱ्या दुसऱ्या बिबट्याला काल सायंकाळी पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अहिल्यानगर शहरातील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्तीच्या भागात तसेच महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत असल्याने नागरिकांसह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाच्या पथकाकडून ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिसरावर लक्ष ठेवले जात आहे. तसेच संभाव्य मार्गांवर पिंजरे लावून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि वनविभागाच्या पथकाची मदत घेऊन शोधमोहीम सुरू असली, तरी अद्याप या बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही.
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या शेंडी, पोखर्डी आणि पिंपळगाव उज्जैनी परिसरातही बिबट्याचा वावर असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या माहितीची गंभीर दखल घेत वनविभागाच्या पथकाने संबंधित परिसरात पाहणी करून शोधमोहीम सुरू केली होती. सुरुवातीला शहरातील शासकीय कार्यालयांच्या परिसरात आणि शेंडी-पिंपळगाव परिसरात दिसणारा बिबट्या एकच असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, दोन्ही भागांतील बिबट्याच्या हालचालींच्या वेळा आणि भौगोलिक अंतर लक्षात घेता हे दोन वेगवेगळे बिबटे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार वनविभागाने शेंडी, पोखर्डी आणि पिंपळगाव उज्जैनी परिसरात पिंजरे लावले होते. अखेर काल सायंकाळी यापैकी एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/nagpur-major-ed-crackdown-on-sand-mafias-assets-worth-%e2%82%b916-23-crore-seized-transactions-worth-crores-carried-out-using-forged-e-tps-electronic-transport-permits/
मात्र, शहरातील शासकीय कार्यालयांच्या परिसरात वावरणारा दुसरा बिबट्या अद्याप मोकाट असल्याने वनविभागासमोर त्याला पकडण्याचे मोठे आव्हान कायम आहे. यासंदर्भात वनविभागाचे अधिकारी तेलोरे यांनी माहिती देताना सांगितले की, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कार्यालयांच्या नजीकच्या परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. लवकरच या बिबट्यालाही जेरबंद करण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नागरिकांनी बिबट्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावरील अप्रमाणित व्हिडिओ आणि संदेश पुढे पाठवू नयेत तसेच घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. एक बिबट्या जेरबंद झाल्याने शेंडी, पोखर्डी आणि पिंपळगाव उज्जैनी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अहिल्यानगर शहरातील शासकीय कार्यालयांच्या परिसरात वावरणारा दुसरा बिबट्या कधी जेरबंद होणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
Source: Prahaar News
