Hashtagintro

Maharashtra Milk Price Hike: दूध महागणार! गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ

पुणे: दूध व्यवसायातील सर्वच कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ आणि दूध खरेदी दरातही यापूर्वीच वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे खरेदी दरवाढीचा विचार करून गाय आणि म्हशीच्या दुधाच्या प्रचलित विक्री दरात प्रतिलिटरला प्रत्येकी चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ या दूध डेअऱ्यांच्या शिखर संघाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. तसेच दुग्धजन्य उपपदार्थाच्या दरात १० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यात आली असून, या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून (दि.१६) करण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याणकारी संघाची बैठक अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१३) कात्रज दूध डेअरीत दुपारी पार पडली. त्याला राज्यभरातून सहकारी व खासगी दूध संघांचे ४५ प्रतिनिधी उपस्थित होते. गाय, म्हैस दुधाच्या प्रचलित विक्री दरात चार रुपयांच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे. राज्यात गायीचे दूध विक्रीचा सध्याचा सरासरी दर ६२ ते ६४ रुपयांवरून वाढून आता ६६ ते ६८ रुपये होईल. तर म्हैस दूध विक्रीचा सध्याचा सरासरी दर ७६ ते ७८ वरून ८० ते ८२ रुपये होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्यासह मानद सचिव प्रकाश कुतवळ, संचालक श्रीपाद चितळे, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे व मान्यवर उपस्थित होते.

याबाबत म्हस्के आणि कुतवळ म्हणाले, मागील काळात डिझेल दरात सातत्याने वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. शिवाय पाऊच पॅकिंगसाठीच्या प्लास्टिकचे दरही वाढलेले असून साखरेचे दरही सातत्याने वाढले आहेत. शिवाय मनुष्यबळाच्या खर्चातही वाढ झाली आहे. दुधाचे खरेदी दर मागील काही दिवसांत पाच रुपयांनी वाढलेले असून, पुढील काळातही दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाय आणि म्हशीच्या दुधाला योग्य मोबदला मिळण्यासही हातभार लागलेला आहे.

तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळीला आळा

राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळखोरांवर धडक कारवाई सुरू ठेवल्याने भेसळखोरांना आळा बसला. सध्या राज्यात सरासरी रोजचे होणारे १ कोटी ६० लाख लिटरइतके दूध संकलन वाढून आता १ कोटी ६१ लाख ८३ हजार लिटरइतके होत आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार दुधाच्या खरेदीस चढाओढ होऊन मागील काही दिवसांत गायीच्या दुधाचे खरेदी दर प्रतिलिटरला ३७ वरून ४२ रुपयांपर्यंत वाढले. त्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही वाजवी भाव मिळण्यास मदत झाल्याचे कुतवळ यांनी सांगितले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language