Hashtagintro

Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका! चौघांचा मृत्यू; आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर ठेवले मृतदेह!

Manipur CM bungalow protest : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) रात्री आणि आज (दि. १९) सकाळी घडलेल्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील नोंगसुम टेकड्यांजवळ संशयित कुकी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात तीन मैतेई व्यक्ती ठार झाल्या, तर तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे, दोन्ही समुदायांमध्ये काही काळ शांतता नांदल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्‍यान, या हिंसाचाराच्या निषेधार्थ संतप्त आंदोलकांनी दोन मृतदेह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवले. पोलिसांनी जमावाला हटवले असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

संगीत कार्यक्रमादरम्यान हिंसाचार

मैतेई आणि पांगल वस्ती असलेल्या भागात एका संगीत कार्यक्रमादरम्यान हिंसाचार उसळला. येथे दगडफेक आणि गोळीबार झाला. गोळीबारात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील खामेनलोक येथे जवळच्या टेकड्यांवर सरपण गोळा करायला गेलेल्या किमान तीन ग्रामस्थांची संशयित आदिवासी बंडखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात इतर तीन जणही जखमी झाले आहेत.

ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट

या हत्यांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी पीडितांचे मृतदेह सोबत घेऊन इम्फाळमधील मुख्यमंत्र्यांच्या अतिसुरक्षित निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. संतप्त जमावाने तिथे मृतदेह ठेवले, त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. दरम्यान, हिंसाचारानंतर सुरक्षा यंत्रणांनी गोळीबार झालेल्या ठिकाणाची पाहणी करून परिसर सुरक्षित केला आहे. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांनी ‘राज मेडिसिटी हॉस्पिटल’मध्ये उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेतली.

स्थानिक आमदार थोकचोम सिंग यांच्याकडून प्रशासनाला आवाहन

स्थानिक आमदार थोकचोम लोकेशोर सिंग यांनी हिंसाचार प्रकरणी प्रशासनाला त्वरित हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या परिसराजवळ असलेल्या ‘सिनाई कॅम्प’ नावाच्या ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स’ (SoO) छावणीला तिथून हटवण्याची मागणी केली आहे.

मैतेई आणि कुकी समुदायांमधील तणाव पुन्हा वाढला

या हत्येमुळे मैतेई आणि कुकी समुदायांवरील अविश्वास अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मणिपूरमध्ये मे २०२३ मध्ये वांशिक हिंसाचार सुरू झाल्यापासून या दोन्ही समुदायांचे संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. इम्फाळ पूर्व-कांगपोकपी सीमेजवळील संवेदनशील ठिकाण पाहता, तणावात आणखी वाढ झाल्यास शांतता धोक्यात येईल, असा इशाराही आमदार थोकचोम लोकेशोर सिंग यांनी दिला आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language