Hashtagintro

Mira Bhayandar Abhay Scheme : ओसी नसलेल्या इमारतींसाठी अभय योजना

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेची शुक्रवारी पार पडलेल्या तहकुब महासभेत ज्या इमारतींनी अद्याप भोगवटा दाखला प्राप्त केलेला नाही, त्या इमारतींना भोगवटा दाखला (ओसी) देण्यासाठी अभय योजना राबविण्याचा सत्ताधारी भाजपकडून मांडण्यात आलेला ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. मात्र हि योजना केवळ अधिकृत तसेच बांधकाम असलेल्या इमारतींसाठीच लागू केली जाणार असून अशाच इमारतींना भोगवटा दाखला देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हा ठराव भाजपचे नगरसेवक मदन सिंह यांनी मांडला. तर काँग्रेसचे नगरसेवक शॉन कोलासो यांनी वेगळा ठराव मांडला. शहरात शेकडो गृहनिर्माण संस्था आहेत. यातील अनेक गृहनिर्माण संस्थांनी अद्यापही भोगवटा दाखला घेतलेला नाही. त्यामुळे अशा इमारतींच्या पुनर्विकासात अडथळा निर्माण होतो. कारण अशा इमारतींच्या पुनर्विकासावेळी त्यातील रहिवाशांना मिळणाऱ्या वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकाचा फायदा मिळत नाही.

अशा इमारतींतील सध्याचे वाढीव बेकायदेशीर बांधकामाचे क्षेत्र सुमारे ५०० चौरस फूट असल्यास मंजूर नकाशात सुमारे ४०० चौरस फुटाचे बांधकाम नमूद असल्यास हे निश्चित चटईक्षेत्र निर्देशांक ग्राह्य धरूनच नवीन विकास नियमावलीनुसार वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक रहिवाशांना उपलब्ध होते. अशा इमारतींच्या बेकायदेशीर वाढीव बांधकामामुळे त्या इमारतींना भोगवटा दाखला मिळण्यात तांत्रिक अडचण निर्माण होते.

याउलट ज्या इमारतींचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे झाले आहे त्या इमारतींना अद्याप भोगवटा देण्यात आलेला नाही अथवा त्या इमारततींकडून हा दाखला मिळविण्यासाठी पालिकेकडे अद्याप प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. त्या अधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींना हा दाखला देण्यासाठी अभय योजना लागू करण्याचा ठराव भाजपचे नगरसेवक मदन सिंह यांनी शुक्रवारच्या तहकुब महासभेत मांडला. तर काँग्रेसचे नगरसेवक शॉन कोलासो यांनी हा दाखला केवळ अधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींनाच देण्याचा ठराव मांडला.

या दोन्ही ठरावांवर मतदान घेण्याचे निर्देश महापौर डिंपल मेहता यांनी उप नगरसचिव दिनेश कानगुडे यांना दिले. यानुसार घेण्यात आलेल्या मतदानाप्रमाणे मदन सिंह यांचा ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे महापौरांकडून जाहिर करण्यात आले. यामुळे ज्या इमारतींनी अद्याप भोगवटा दाखला घेतलेला नाही त्या इमारतींनी अभय योजनेचा फायदा घेऊन इमारत अधिकृत करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language