Hashtagintro

Nashik : कसारा घाटात सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 11 जण जखमी

Nashik : नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटेच्या सुमारास सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगत असलेल्या मोठ्या दरडीवर आदळला. या दुर्घटनेत ट्रकच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रकमधून प्रवास करणारे ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथून सिमेंट घेऊन एमएच ४३ बीएक्स २४२४ क्रमांकाचा ट्रक भिवंडीच्या दिशेने जात होता. प्रवासादरम्यान चालकाने मालेगाव महामार्गावरून कल्याण आणि भिवंडी येथे जाणाऱ्या काही प्रवाशांना ट्रकच्या केबिनमध्ये बसवले होते. पहाटे तीनच्या सुमारास ट्रक कसारा घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडीवर जाऊन आदळला.
या अपघातात ट्रकचा वाहक शेख महोम्मद मुनाफ कुरेशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर शबान अब्दुल शेख (४५), शकील खलील शेख (१९), जकिरा करीम सय्यद (६५), अफसाना सय्यद (३६), वसीम करीम सय्यद (४३), अलिशा सय्यद (२०), महोम्मद सय्यद (८४), वारीस सय्यद (८४), मुस्कान सय्यद (११), अनम अन्सारी (३५) आणि शकील अन्सारी (३०) हे ११ प्रवासी जखमी झाले. हे सर्व प्रवासी कल्याण आणि भिवंडी परिसरातील रहिवासी आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/12/nashik-a-grand-memorial-for-bhagwan-birsa-munda-will-be-built-in-nashik-a-fund-of-4-crore-rupees-has-been-sanctioned/
पोलीस , आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, कसारा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि घोटी महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस हवालदार चौधरी, बोरकर यांच्यासह सुनील करवर, नंदू जाधव, शाम धुमाळ, दत्ता वाताडे आणि लक्ष्मण वाघ यांनी बचावकार्यात सहभाग घेतला. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनीही मदतीचा हात पुढे केला. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमीला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रक दरीत कोसळण्यापासून बचावला
प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या वेळी कसारा घाट उतरत असताना चालकाला डुलकी लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, ट्रक नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन दरीच्या दिशेने न वळवता दरडीच्या दिशेने वळवले. त्यामुळे ट्रक दरडीवर आदळला. चालकाने वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे ट्रक थेट खोल दरीत कोसळण्याचा संभाव्य धोका टळल्याची चर्चा घटनास्थळी होती. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निखिल लसने आणि महामार्ग पोलीस केंद्राचे राम होंडे करीत आहेत.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language