भिलवडी : भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंकलखोप येथील शेतातून चंदनाची आठ झाडे तोडून लाखांचे चंदन लंपास करणाऱ्या चोरट्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून छोटा टेम्पोसह १४ चंदनाचे ओंडके व ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंकलखोप येथील पोस्ट ऑफिसजवळ राहणारे अभिजित मोहनराव पाटील (वय ५४) यांच्या गट क्रमांक ६२३ मधील शेतात ही घटना घडली. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते १० नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी शेतातील चंदनाची आठ झाडे कापून त्यांचा गाभा चोरून नेला होता. चोरीस गेलेल्या चंदनाची अंदाजे किंमत १ लाख ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अभिजित पाटील यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी सूरज एकनाथ पाटोळे (वय २३, रा. मायी कुंभारवाडा, ता. खटाव, जि. सातारा) याला अटक केली आहे. तसेच रोहित मदने (रा. अळसंद, ता. पलूस) हा फरार आहे.
४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३४९ किलो ३०० ग्रॅम वजनाचे, दोन ते पाच फूट लांबीचे आणि १७ ते २९ इंच व्यासाचे चंदनाचे १४ ओंडकेजप्त केले आहेत. तसेच सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा छोटा टेम्पो (एमएच ०४, जेके ४९३४) असे मिळून एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण दिडवाघ, उपनिरीक्षक रोहिदास पावशे, सहायक उपनिरीक्षक शौकत इनामदार, शिपाई स्वप्निल शिंदे, धीरज खुडे, चालक तोसिफ मुजावर व ओंकार जाधव यांनी संशयितास ताब्यात घेतले.
Source: Pudhari News
