Hashtagintro

Women Online Love Fraud: लग्नाचे आमिष दाखवून महिलांची कोट्यवधींची फसवणूक; अभियंता असलेला सराईत आरोपी कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

कर्जत: सोशल मीडियाद्वारे तरुणी व महिलांशी संपर्क साधायचा, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवायचे आणि त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून आर्थिक फसवणूक करायची, अशा पद्धतीने राज्यातील अनेक महिलांना लक्ष्य केलेल्या अभियंता असलेल्या सराईत आरोपीला अखेर कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे.

संदीप केशव चव्हाण (वय ३०, रा. सिद्धनाथ वडगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीने राज्यातील महिलांची एक कोटींपेक्षा अधिक आर्थिक फसवणूक केल्याचा संशय असून, फसवणुकीतून मिळालेली रक्कम ऑनलाइन जंगली रमी खेळण्यात खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असतानाही मोबाईल क्रमांक आणि सीमकार्ड सातत्याने बदलून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे कर्जत पोलिसांनी वेरूळ (जि. छत्रपती संभाजीनगर) परिसरातून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईची माहिती कर्जतचे पोलिस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी दिली.

सोशल मीडियाद्वारे ओळख, प्रेमाचे आमिष अन् आर्थिक फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप चव्हाण हा इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून मुली आणि महिलांशी संपर्क साधत असे. सुरुवातीला मैत्री, त्यानंतर प्रेमसंबंध आणि पुढे लग्नाचे आश्वासन देऊन महिलांचा विश्वास संपादन केला जात असल्याचा आरोप आहे. विश्वास निर्माण झाल्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून आर्थिक मदत मागणे, महत्त्वाची कागदपत्रे मिळवणे आणि त्यातून आर्थिक गैरव्यवहार करणे, अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे तपासात समोर आले आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा संशय आहे. काही प्रकरणांमध्ये महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप असून, त्यासंदर्भातही विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

कर्जतमधील महिलेची ७ लाखांची फसवणूक

येथील प्रकरणात आरोपीने २६ जुलै २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत एका महिलेशी मोबाईलद्वारे संपर्क साधला होता. आपण ‘ध्रुव’ कंपनीचा मॅनेजर असून कंपनीत भागीदार म्हणून विश्वासू सहकारी हवा असल्याचे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुक आणि पॅनकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे मिळवून महिलेची तब्बल ७ लाख २ हजार ३७२ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी २७ ऑक्टोबर २०२४ रोजी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता.

सीमकार्ड बदलून पोलिसांना देत होता गुंगारा

आरोपीवर राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र, मोबाईल क्रमांक आणि सीमकार्ड सातत्याने बदलून तो पोलिसांना चकवा देत होता. अखेर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी वेरूळ येथे असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी विशेष तपास पथक रवाना केले. पोलिसांनी सापळा रचून संदीप चव्हाण याला अटक केली.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर आणि पोलिस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language