Hashtagintro

World Most Dangerous Bird | जगातील सर्वात खतरनाक पक्षी!

सिडनी : लांबी सुमारे २ मीटर, शरीरावर काळ्या केसांसारखी पिसे आणि मान निळ्या-लाल रंगांनी सजलेली; पण या सुंदर रूपाच्या आभासावर अजिबात जाऊ नका; कारण हा देखणा पक्षी कधी संकटाचे कारण बनेल याचा नेम नाही. डायनासोरसारखी रचना असलेला हा पक्षी म्हणजे ‘कॅसोवरी’ होय. याची गणना जगातील सर्वात खतरनाक पक्ष्यांमध्ये केली जाते. याचे बळकट पाय आणि खंजिरासारखी नखे याला अत्यंत शक्तिशाली बनवतात. हा पक्षी सामान्यतः माणसांपासून लांब राहणेच पसंत करतो.

कॅसोवरीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याच्या डोक्यावर असलेली शिरस्त्राणासारखी (हेल्मेटसारखी) कठीण रचना, ज्याला ‘कॅस्क’ (Casque) म्हणतात. त्याच्या शरीरावर काळी, खडबडीत पिसे असतात, तर मान निळसर आणि जांभळरंगी दिसू शकते. मानेखाली लटकणारी लाल रंगाची त्वचा हीदेखील याचीच ओळख आहे. या अनोख्या बनावटीमुळे त्याला अनेकदा डायनासोरसारखा दिसणारा पक्षी म्हटले जाते. शास्त्रज्ञांच्या मते, कॅसोवरी हा प्राचीन उडू न शकणाऱ्या पक्ष्यांच्या समूहाशी जोडलेला आहे, ज्याचा उत्क्रांतीचा इतिहास कोट्यवधी वर्षे जुना आहे. मात्र, याला थेट एखाद्या विशिष्ट डायनासोरचा वंशज म्हणणे योग्य ठरणार नाही.

कॅसोवरी उडू शकत नाही; परंतु त्याच्या पायांवरून त्याच्या ताकदीचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्याच्या प्रत्येक पायाला तीन बोटे असतात आणि मधल्या बोटावर खंजिराच्या आकाराचे नख असते, जे सुमारे १२ सेंटिमीटरपर्यंत लांब असू शकते. धोका जाणवल्यास किंवा गराडा पडल्यास तो आपल्या पायांनी जोरदार वार करू शकतो. त्याचा हा हल्ला गंभीर दुखापत पोहोचवू शकतो आणि काही प्रकरणांमध्ये जीवघेणाही ठरू शकतो. म्हणूनच याची गणना खतरनाक पक्ष्यांमध्ये केली जाते.

कॅसोवरीचे मजबूत पाय त्याला घनदाट जंगलांमध्ये वेगाने चालण्यास आणि धावण्यास मदत करतात. काही प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संस्थांच्या मते, हा पक्षी ताशी सुमारे ५० किलोमीटर वेगाने धावू शकतो. उडण्याऐवजी तो जमिनीवरच आपली ताकद दाखवतो. घनदाट वनस्पतींच्या मधोमध त्याचे शरीर सहज पुढे सरकते आणि तो नजरेआडही होतो. कॅसोवरीच्या प्रमुख प्रजाती ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी आणि आसपासच्या काही बेटांच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतात.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language